Monday, December 23, 2024
Homeसामाजिकआगामी सण-उत्सवाच्या निमित्ताने पातूर शहरात शांतता कमिटीची बैठक संपन्न...

आगामी सण-उत्सवाच्या निमित्ताने पातूर शहरात शांतता कमिटीची बैठक संपन्न…

पातूर – निशांत गवई

14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच सध्या सुरू असलेल्या रमजान महिना व येणारा ईद सणाच्या निमित्ताने पोलिस स्टेशन पातूर येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. आगामी सण उत्सव पाहता पातूर शहरासह तालुकभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुल राज यांच्या निर्देशानुसार पातूर पोलीस स्टेशन येथे आज दि.11/4/2023 रोजी शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

सदर बैठक पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनिरीक्षक मीरा सोनुने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीस पातूर शहरातील सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीचे स्वप्निल सुरवाडे,निर्भय पोहरे,प्रविण पोहरे,राजेंद्र पोहरे पातूर शहरातील पत्रकार दुले खान,संजय गोतरकार,अविनाश पोहरे,राजाराम देवकर पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी यांनी होऊ घातलेल्या भिमजयंती उत्सवादरम्यान असलेल्या नियम व अटींचे पालन करण्यास संबंधित भिमजयंतीच्या आयोजकांना आवाहन केले. त्याचप्रमाणे बैठकीस उपस्थितांचे जनमत घेतले असता पत्रकार दुले खान यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गाची दुरावस्था झाली असून देवडी मैदान ते काझी पुऱ्यापर्यंत पाणी पुरवठा विभागाने रस्ता मधोमध खोदून ठेवला असून त्यामुळे भिम अनुयायांना अडचण निर्माण होत असल्याचे लक्षात आणून दिले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर चे ठाणेदार हरिष गवळी यांच्या निर्देशानुसार पातूर पोलिसांकडून नगर परिषदेला सदर मिरवणूक मार्गाची डागडुजी करून मार्ग मोकळा करावा अशे पत्र देणार असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे मिरवणूक सुरू असताना रहदारीमुळे मिरवणुकीस अडथळा होऊ नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदर रहदारी पर्यायी मार्गाने वळती करावी असे मत उत्सव समितीचे निर्भय पोहरे यांनी मांडले होते.दरम्यान उपस्थितांनी केलेल्या जनमतावर पातूर पोलीस गंभीर असून योग्य ते उपाय करण्यात येतील असे यावेळी पातूर पोलिसांनी आश्वासन दिले.

पातूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीच्या निर्भय पोहरे,स्वप्निल सुरवाडे, प्रवीण पोहरे,राजेंद्र पोहरे आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद ठेवावी तथा अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: