Sunday, December 22, 2024
Homeराज्यभारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या विराट पदयात्रा...

भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या विराट पदयात्रा…

प्रदेशाध्यक्ष पटोले यांची नागपूरात पदयात्रा

राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी – नाना पटोले

भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी – थोरात

मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लूट – अशोक चव्हाण

मुंबई – भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली व त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरच्या संगमनेर येथे व माजी मुख्यमंत्री,

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अकोला येथे पत्रकार परिषदा घेऊन पदयात्रा काढून सभा घेतल्या.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरमध्ये देवडिया भवनपासून पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेत, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री सुनिल केदार, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, सोशल मीडियचे विशाल मुत्तेवार,

मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश व्यापारी सेलचे अध्यक्ष अतुल कोचेटा आणि रोमन पैगवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, दोन खासदार असलेला भाजपा आज बहुमताने केंद्रातील सत्तेत आला आणि देशाचे संविधान, लोकशाही संपवायचे काम करू लागला आहे.

देशात विद्वेष पसरवला जात असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशातील वातावरण बदलले. पदयात्रेदरम्यान सर्व जाती धर्मांच्या लोकांना राहुल गांधी यांनी जवळ केले व त्यातून मोठे राजकीय परिवर्तन निर्माण केले. आपली लढाई देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे त्यासाठी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जनसंवाद यात्रा काढून संवाद साधला जात आहे.

संगमनेरमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी विराट पदयात्रा काढण्यात आली व त्यानंतर विराट सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षाताई रुपवते,

ॲड. माधवराव कानवडे आदींसह अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केली.

ही पदयात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली. या पदयात्रेनंतर देशातील व राज्यातील वातावरण बदलेले आहे. जाती व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपाची मोजक्या राज्यांमध्ये सत्ता राहिली आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार मूळ प्रश्नांवर भर देण्याऐवजी जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करत आहे.

ईडी व सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. पण आता वातावरण बदलेले आहे. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन होणार आहे. काँग्रेसचा समतेचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करा.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आय.टी.आय ते कुसुम सभागृह पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर,

माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भारत यात्री श्रावण रॅपनवाड, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजिब आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले की, “बहुत हुई महंगाई की मार ……” असे आश्‍वासन देत २०१४ पासून सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ९ वर्षात आपल्या आश्‍वासनाचे पालन न करता जनविरोधी धोरणे राबवली. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असून सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मोदींनी नऊ वर्षांच्या काळात फक्त जनतेची लूट केली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अकोला जिल्ह्यातील सौंदळा येथे पदयात्रेत सहभाग घेतला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा मनमानी कारभार देशात सुरू आहे. सर्व क्षेत्रात मोदी सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे, यातून निवडणूक आयोग व न्यायव्यवस्था सुद्धा सुटलेली नाही. आता बदल करायचा आहे आणि काँग्रेसला निवडून द्यायचे आहे ही भावना नागरिक व्यक्त करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या पदयात्रेमुळे संपूर्ण देशात सध्या परीवर्तनाचे वारे वाहत असून आगामी काळात देशात ‘इंडीया’ चे तर राज्यात ‘महाविकास आघाडी’ चे सक्षम सरकार सत्तारूढ होईल. देशात विद्वेषाच्या राजकारणामुळे सर्वत्र अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत इंडीया आघाडी कडून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय मिळाला आहे.

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी नाशिक येथे, विधान परिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर, सांगली येथे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, परभणी येथे माजी मंत्री अनिल पटेल, नंदूरबार येथे माजी मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री वसंत पुरके यांनी गडचिरोली येथे, पिंपरी चिचवड शहरात आमदार रविंद्र धंगेकर यांनी,

भंडारा येथे नाना गावंडे, धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री अनिस अहमद यांनी भिवंडी येथे, हिंगोली येथे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, पुणे येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पद यात्रा काढली. यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रा काढण्यात आल्या. या यात्रेंमध्ये काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: