अमरावती – दुर्वास रोकडे
शासनाव्दारे महसुल दिनापासून दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात महसुल पंधरवडानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालय, अमरावती येथे बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी युवासंवाद कार्यक्रम व नागरिकांसाठी मोफत अर्ज लिहून देण्याच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी युवकयुवतीना मार्गदर्शन केले.
तहसिल कार्यालय जुन्या इमारतीतून नविन इमारतीमध्ये स्थानांतरित झाल्यामुळे व नविन इमारतीच्या जवळपास लेखनिकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांना जुन्या तहसिल कार्यालयात अर्ज लिहुन नविन कार्यालयात आणून द्यावे लागत होते. नागरिकांची ही पायपीट कमी करण्यासाठी सर्व अर्ज तहसिल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून तहसिल कार्यालयात मोफत भरुन दिले जाणार आहेत. त्याकरिता अर्जाची उपलब्धता करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांची मोठी सोय होणार असून या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले आहे.
तहसिल कार्यालयाच्या सभागृहात युवासंवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षा तयारी करणारे युवकयुवती उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भुसंपादन प्रसेनजित चव्हाण यांनी युवकांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. युवकांनीही त्यांना प्रश्न विचारून प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.
उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, तहसिलदार विजय लोखंडे यांनीही स्पर्धा परिक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कायक्रमांचे सुत्रसंचालन निवासी नायब तहसिलदार सुनिल रासेकर यांनी तर आभार प्रदर्शन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार राजू दंडाळे, महसूल नायब तहसिलदार टिना चव्हाण, संगायो नायब तहसिलदार स्नेहा देशमुख आदी उपस्थित होते.