Monday, December 23, 2024
Homeराज्यअतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे...

अतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे सुरू…

आकोट- संजय आठवले

आकोट शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी मोहीम बंद ठेवण्यात आली असून आगामी महाशिवरात्री व छत्रपती शिवराय जयंती या सणांच्या बंदोबस्तात पोलीस गुंतल्याने हा ब्रेक घेण्यात आला आहे. परंतु हे सण आटोपल्यावर पुढील आठवड्यात ही मोहीम पुन्हा कार्यप्रवण होणार असून यादरम्यान पालिकेद्वारे शहरातील अतिक्रमणांची सखोल माहिती घेणे सुरू आहे.

महाशिवरात्री आणि छत्रपती शिवरायांची जयंती आकोट शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते. या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. त्याचा परिणाम सध्या शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेवर झाला आहे. या सणांच्या बंदोबस्तात पोलीस गुंतले आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेकरता आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकत नव्हता. या कारणाने चौथ्या दिवशी ही मोहीम बंद ठेवण्यात आली. हे दोन्ही मोठे सण आटोपल्यावर पुढील आठवड्यात ही मोहीम पुन्हा आरंभ होणार आहे. या ब्रेक कालावधीमध्ये मात्र पालिकेने शहरातील अतिक्रमणांची माहिती घेणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण थांबले त्या ठिकाणच्या अतिक्रमित अथवा अनधिकृत बांधकामांच्या कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली आहे. याच दरम्यान शहराच्या नंदीपेठ भागातील रस्ता मोकळा करण्याकरिता या भागात भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करण्यात आली आहे.

हा मार्ग सोनू चौक येथून थेट नंदी पेठ मधून दर्यापूर मार्गाला मिळतो. या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी अडथळा येत असल्याने या मार्गाची मोजणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाची अतिक्रमणे हटविण्यात सोयीचे जाणार आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता मुख्याधिकारी डॉ. बेंबरे यांनी सांगितले की, सर्वच बाबतीत माहिती घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. या कामात नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: