Friday, November 22, 2024
Homeग्रामीणअहो आश्चर्यम्!...सरपंच पदाची निवडणूक लढविण्याकरिता गावकऱ्यांनी चक्क मोर्चा नेऊन माजी सरपंचाच्या घराला...

अहो आश्चर्यम्!…सरपंच पदाची निवडणूक लढविण्याकरिता गावकऱ्यांनी चक्क मोर्चा नेऊन माजी सरपंचाच्या घराला घातला घेराव…

आकोट- संजय आठवले

सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सरपंच पद थेट जनतेतून निवडावयाचे असल्याने अनेक इच्छुकांनी कंबरा कसून आपल्या परीने फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. अशा स्थितीत यावेळी सरपंच पदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी सरपंचानेच ही निवडणूक लढवावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी चक्क त्यांच्या घरी मोर्चा नेऊन त्यांचे घराला घेराव घातल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.

एखाद्या चित्रपटात शोभणारी ही अविश्वसनीय घटना घडली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावी. या गावातील व्यावसायिक प्रकाश चौगुले हे व्यवसायानिमित्ताने कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनीत राहतात. तिथे राहून त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई चौगुले यांनी मागील निवडणुकीत म्हाळुंगे गावाची सरपंच पदाची निवडणूक लढविली. त्यात त्या विजय झाल्या. सरपंच झाल्यावर त्यांचे पुत्र प्रकाश चौगुले यांनी गावात विकासाचा वारू चौफेर उधळविला. निगर्वी वर्तन आणि विकासाचा निरपेक्ष सोस ह्याने त्यांनी गावाचा संपूर्ण कायापालट केला. रस्ते, नाल्या, पथदिवे यांनी गाव उजळून टाकले. या कामांच्या सोबतीला त्यांनी गावातील महिला वर्गासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांना साक्षर आणि स्वयंपूर्ण बनविण्याकरिता गावात अनेक योजना राबविल्या. त्यामुळे संपूर्ण गावात त्यांची प्रतिमा अतिशय आदरणीय बनली.

आता पार्वतीबाईंचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपूर्ण झाला. म्हाळुंगे गावाची निवडणूक पुन्हा घोषित झाली. आणि चौगुले परिवाराने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आता आपल्याऐवजी गावातील कुण्या तरी होतकरू तरुणाचे हाती सरपंच पद देण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण गाव व्यथित झाला. प्रकाश चौगुले यांच्या मातोश्रींनी अथवा स्वतः त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी गावकऱ्यांनी त्यांना गळ घातली. परंतु चौगुले आपल्या निश्चयावर अडीग राहिले. त्यामुळे गावकऱ्यांनी एक अफलातून प्रयोग केला. संपूर्ण गावकऱ्यांनी चक्क कोल्हापूर गाठले. तेथे त्यांनी प्रकाश चौगुले यांचे निवासस्थानी मोर्चा नेऊन त्यांचे घराला घेराव घातला. आणि त्यांच्या परिवारातील कुणीतरी म्हाळुंगे ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक लढविण्याचे साकडे घातले. ही मागणी पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांनी तेथेच ठिय्या मांडून अन्न जल वर्ज्य करण्याचा निर्धार केला.

या घटनेची कोल्हापूर परिसरात मोठी चर्चा झाली. आणि “तुम्ही लोकांची गरज बना लोक चालून तुम्हाकडे येतील” असा धडा राजकारण्यांना मिळाला. प्रत्येक निवडणुकीत कोणीच नको म्हणून नोटाचा प्रकार वाढत असताना ही घटना मात्र मूलखावेगळी ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: