नागपूर – शरद नागदेवे
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची नागपूर विभागीय बैठक रविभवन येथील सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाली. या बैठकीदरम्यान नागपूर विभागातील विविध खात्यातील राजपत्रित अधिकारी यांनी एकत्रित येऊन शासकीय कामकाजाच्या वेळी येणार्या अडचणी व आस्थापना बाबी संदर्भातील प्रश्नांबाबत अधिकारी महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना अवगत केले.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष कमलकिशोर फुटाणे यांनी प्रास्ताविकात या बैठकीच्या आयोजनाची भूमिका सविस्तरपणे विशद केली. यावेळी महासंघाचे राज्य संघटक डॉ.प्रमोद रक्षमवार, अमरावती विभागाचे अध्यक्ष डॉ.संदीप इंगळे, नागपूर विभागाच्या महिला सहसचिव श्रीमती संघमित्रा ढोके यांनी सुद्धा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यस्तरीय पदाधिकारी यांना अवगत केले.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस श्री. समीर भाटकर यांनी महासंघ शासनाशी समन्वय ठेऊन, आवश्यक तेंव्हा चर्चा करून प्रसंगी कठोर भूमिका घेऊन राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवत असून महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, पांच दिवसांचा आठवडा, सुधारित घर भाड्यासह सातवा वेतन आयोग,
आकस्मिक मृत्यू पावलेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना अनुकंपा अंतर्गत शासकीय नोकरी, अधिकार्यांना मारहाण व दमबाजी विरुद्ध पाच वर्षे शिक्षेची तरतुद असणारा सक्षम कायदा,केंद्राप्रमाणे थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता ईत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून मान्य करून घेण्यामागे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यासाठी शासनाबरोबर अत्यंत संयमितपणे चर्चा केलेली असल्याची बाब त्यांनी याप्रसंगी सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.
सर्व अधिकार्यांनी आपल्या खात्याच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. राजपत्रित महासंघाचे संस्थापक तथा मुख्य मार्गदर्शक श्री.ग .दी. कुलथे यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू आहेत व ते आपल्या मागण्यांबाबत अतिशय सकारात्मक असल्यामुळे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याची आपली मागणी लवकरच मान्य होईल याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
जुनी पेन्शन योजनेअंतर्गत शासनाने यापुर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास व त्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आल्यास होणाऱ्या या आंदोलनात महासंघ अग्रभागी राहील असे देखील त्यांनी सांगितले. राजपत्रित अधिकारी महासंघाने केवळ अधिकाऱ्यांच्या हक्कांबाबत मागणी केलेली नसून त्यांच्या कर्तव्याबाबत देखील “पगारात भागवा अभियान ” व ” कार्यसंस्कृती अभियान ” राबवून त्याद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
त्यांनी उपस्थित सर्व अधिकार्यांना कर्तव्यदक्ष राहून जनतेची कामे सकारात्मक भावनेने करण्याचे आवाहन केले. संपूर्ण देशामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सेवेत असणार्या व सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी मुंबईतील बांद्रा या विकसित उपनगरामध्ये बहु उपयुक्त अशा”आपले कल्याण केंद्र ” निर्मितीचे कार्य हाती घेतले असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केलेली आहे.
यामुळे मुंबई येथे कामकाजासाठी येणार्या अधिकाऱ्यांची निवासाची व्यवस्था होणार असुन त्यासाठी सर्व राजपत्रित अधिकार्यांनी निधी संकलनासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. श्री. कुलथे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा उपनिबंधक श्री. गौतम वालदे, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सुरेंद्र मनपिया, वस्तू व सेवा कर विभागाचे संतोष हेमने व प्रकाश वाघ, वनविभागाचे निलेश गावंडे व मंगेश ताठे,
कामगार विभागाचे श्री पाटणकर व श्री लोया, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे ,भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णु शिंदे यांनी कल्याण केंद्र निधी याप्रसंगी श्री.कुलथे यांचेकडे सुपूर्द केला. सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या एकतेचे व दृढ निश्चयाचे प्रतिक असलेल्या शक्तिपीठ स्वरूपातील या कल्याण केंद्रासाठी निधी संकलन करण्याचे आश्वासन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याबद्दल यावेळी श्री. कुलथे यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीचे प्रास्ताविक महासंघाचे विभागीय सहसचिव योगेश निंबूळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पशुसंवर्धन संघटनेचे डॉ.शशिकांत मांडेकर यांनी केले. या बैठकीच्या यशस्वितेसाठी नागपूर विभागाचे सहसचिव डॉ.प्रविण पडवे, नागपूर जिल्हा समन्वय समितीचे सचिव डॉ.माने, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.मुकींदा जोगेकर ,राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश येवले, लेखा विभागाचे यशपाल गुडधे, किशोर गुल्हाने , समाजकल्याण उपायुक्त सुरेंद्र पवार ,खनिज विभागाचे रोशन मेश्राम व शिवदास वासे यांनी सहकार्य केले.