न्युज डेस्क – महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारानंतर रविवारी खात्यांची विभागणी करण्यात आली. त्यानंतरच सरकारने नवा आदेश जारी केला. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी फोन आल्यावर हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणणे सक्तीचे करतील. याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सांगितले की, सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात फोन आल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे लागेल. आपण स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी फोनवर नमस्तेऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे असे मला वाटते.
“भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
18 ऑगस्टपर्यंत औपचारिक सरकारी आदेश येईल, असे ते म्हणाले. पुढील वर्षी 26 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी ‘वंदे मातरम’ म्हणावे, असे मला वाटते.