आकोट – संजय आठवले
संपूर्ण भारतभर हिंदू धर्मियांतर्फे साजरा होत असलेला राम मंदिर उद्घाटन सोहळा हा ना कुणाच्या विजयाचा दिवस आहे ना पराजयाचा. तर अतिशय पवित्रतेने साजरा करावा लागणारा हा एक धार्मिक प्रसंग आहे. त्यामुळे या दिवशी कुणीही अपवित्र, किळसवाणे व अपराधिक कृत्य करून या सोहळ्याला गालबोट लागेल असे वर्तन न करता, हा दिवस धार्मिक भान ठेवून साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी शांतता बैठकीमध्ये केले.
आकोट शहर व उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात २२ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पर्वावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्या पर्वाचे आधले दिवशी आकोट पोलीस ठाण्यात आयोजित शांतता बैठकीत अनमोल मित्तल बोलत होते.
भारतातील सर्वच नागरिकांना आपापले धार्मिक सण, उत्सव पवित्रतेने व आनंदाने साजरे करण्याचा अधिकार असल्याचे सांगून आकोट शहर व उपविभागातही राम मंदिर उद्घाटनाचे पर्वावर शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
आकोट शहर ठाणेदार तपन कोल्हे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना मित्तल म्हणाले कि, प्रत्येक धर्माचा सोहळा सर्वच साजरा करतात असे नाही. काही सोहळा साजरा करणारे तर काही न करणारेही असतात. राम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा करणारांनी हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे कि, २२ जानेवारी हा दिवस ना कोणत्या विजयाचा आहे ना कोणत्या पराजयाचा आहे.
हा दिवस तर केवळ एक धार्मिक पर्व आनंद व पवित्रतेने साजरा करण्याचा आहे. त्यामुळे हा पवित्र दिवस कलंकित होणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घेणे अनिवार्य आहे. अशावेळी वाद्ये वाजविणाऱ्यांनी पोलीस प्रशासनाद्वारे घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
हे नियम डावलून केलेले कोणतेही कृत्य अपराधिकृत्य मानले जाईल. एखादा उद्भवलेला प्रसंग नागरिकांनी सामोपचाराने जरी मिटविला तरी पोलीस प्रशासनाने मात्र त्यावर कारवाई करावी असे निर्देश असल्याचे मित्तल म्हणाले. यासोबतच २२ जानेवारीचा सोहळा साजरा न करणारे जे लोक असतील, त्यांनी हा सोहळा साजरा करणारांना आपली अडचण होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावी. काही बाबी आपल्याला पटत नसतील तर एक दिवस आपले घरातच राहिल्यास काही फरक पडणार नाही. उलट असे वर्तन केल्याने शहरातील शांतता, सौहार्द्र व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असे त्यांनी सुचविले.
या दिवशी रस्त्यावर ऊगाच गोंगाट करणे, भन्नाट वेगाने वाहने चालविणे, उगीच नारेबाजी करणे, आक्षेपार्ह गाणी वाजवणे या बाबी टाळण्यावर त्यांनी जोर दिला. त्यावर २२ जानेवारी रोजी मटण विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी एका सदस्याने केली. त्यावर मित्तल म्हणाले कि, अशा रीतीने कुणाचीही दुकाने बंद ठेवता येत नाहीत.
मात्र कुणी स्वखुशीने बंद ठेवली तर त्याला मनाई नाही. परंतु एखाद्या धार्मिक स्थळासमोर कोणी हेतूपुरस्सरपणे किंवा त्रास देण्याचे उद्देशाने असा प्रयास करेल तर त्याचेवर मात्र कडक पोलीस कारवाई केली जाईल. बैठकीमध्ये ठाणेदार तपन कोल्हे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी आकोट शहरातील शांतता समितीचे मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.