जप्त रिकाम्या ट्रॅक्टरचे तहसील कार्यालयाच्या आवारातून गेले पार्टस चोरी…
न्याय मिळवून देण्याची ट्रॅक्टर मालकाची उपविभागीय अधिकाऱ्याकडे मागणी…
अहेरी – मिलिंद खोंड
अहेरी तालुक्यात रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे अनेक ठिकाणी नदी -नाल्यातुन बांधकामासाठी अवैधपणे रेती आणून बांधकामासाठी वापरली जात आहे. बांधकामासाठी रेती ची गरज अत्यावश्यक श्रेणीत असते रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने नाइलाजाने घरमालक मिळेल त्या ठिकानाहून रेती वापरून आपले बांधकाम पूर्ण करू इच्छितो.
अवैधपणे रेती तस्करी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभाग विविध ठिकाणी रात्री- बेरात्री,पहाटेपासून च कारवाईसाठी सज्ज असतो. अहेरी येथील नवीन तहसीलदारांनी कार्यभार हाती घेतल्या पासून अवैधपणे रेती तस्करी च्या कारवाईला वेग आला आहे.
आलापल्ली-नागेपल्ली मार्गावरील नाल्यात 29 ऑक्टोबर च्या पहाटे ला अवैध रेती करणारे ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या गस्ती पथकाने पकडले . मात्र हे ट्रॅक्टर रेतीत फसून असल्याने ते काढण्यासाठी मदतीसाठी दुसरे रिकामे ट्रॅक्टर बोलाविण्यात आले.रेतीत फसून असलेले ट्रॅक्टर काढल्यानंतर तहसीलदारांनी चक्क मदतीसाठी बोलावलेले रिकामे ट्रॅक्टर सुद्धा अवैध उत्खनन करण्याचा आरोप लावून दंड भरण्यास सांगून जमा केले असा आरोप ट्रॅक्टर मालकाने अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रार अर्जात केला आहे.
लगेच दुसऱ्या दिवशी अहेरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे सायलेन्सर व एअर फिल्टर चोरीला गेल्याने ट्रॅक्टर मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न आता उभा राहतो आहे.शासकीय कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेल्या ट्रॅक्टर चे पार्टस चोरीला जात असेल तर तहसील कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ असेल याची कल्पना न केलेलीच बरी..
मदतीसाठी रिकामे ट्रॅक्टर आणून ‘ नेकीं कर दर्या मे डाल’ अशी भावना ट्रॅक्टर मालकाला झाली आहे.त्यासोबत जमा केलेल्या ट्रॅक्टर चे पार्टस चोरीला गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे . अश्या दुहेरी संकटात सापडलो असल्याने आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी त्या ट्रॅक्टर मालकाने अहेरीच्या उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्या कडे केलेल्या तक्रार अर्जात केली आहे.