Sunday, December 22, 2024
Homeराज्यअखेर तो अकृषिक आदेश रद्द…गौण खनिज उत्खननाऐवजी केली जात होती विस्फोटकांची साठवणूक…साठा...

अखेर तो अकृषिक आदेश रद्द…गौण खनिज उत्खननाऐवजी केली जात होती विस्फोटकांची साठवणूक…साठा वास्तू बाबत मात्र आदेश नाही…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील मौजे गाजीपुर येथील शेत खदानीकरिता अकृषक करून त्यातील गौण खनिज उत्खनन व वाहन करण्याऐवजी या ठिकाणी विस्फोटकांची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याने उपविभागीय अधिकारी आकोट यांनी सखोल चौकशी व संबंधित विभागांच्या अहवालांचे आधारे सदर शेतास दिलेला अकृषिक परवाना अखेर रद्द केला आहे.

परंतु ही स्फोटके साठविणे करिता तयार केलेल्या साठवणूक वास्तू बाबत मात्र कोणताही आदेश पारित करण्यात आलेला नाही. मोजे गाजीपुर तालुका आकोट येथील गट क्रमांक ८/१ हे शेत दिनांक ६.१२.२०१३ रोजी अकृषीक करण्यात आले. त्यामुळे या शेतातून गौण खनिज उत्खनन व वहन होणे अपेक्षित होते.

मात्र पवन कुमार सुरेश कुमार शर्मा प्रोप्रायटर अभय इंटरप्राईजेस यांनी या ठिकाणी वास्तू उभारून तेथे विस्फोटके साठा व विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करताना अकृषीक आदेशाप्रमाणेच अनेक शासकीय नियमांची पायमल्ली केली जात होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे हा व्यवसाय बंद करणे बाबत तक्रार करण्यात आली.

मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यात जराही रस नव्हता. त्यामुळे हे प्रकरण उपविभागीय अधिकारी आकोट यांचेकडे वर्ग करून त्या संदर्भात अंतिम आदेश पारित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे वर्तमान उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी याप्रकरणी उभय पक्षांची सुनावणी घेतली. त्यासोबतच या प्रकरणाशी संबंधित विभिन्न विभागांचे अहवाल व स्वयंस्पष्ट अहवाल मागविले.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून अखेर दिनांक ११.१०.२०२३ रोजी आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी आदेश पारित करून हा अकृषिक परवाना रद्द केला आहे. परंतु या प्रकरणात केवळ अकृषीक आदेशच रद्द करण्यात आला आहे.

ज्या प्रयोजनार्थ जमीन परवाना दिला त्या वापराचे प्रयोजनात बदल करण्यात आल्याबाबत म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ४५ ब (तीन) नुसार कोणताही दंड आकारण्यात आलेला नाही. याखेरीज जमीन वापराचे प्रयोजन बदलवून उभारलेल्या वास्तूबाबतही मौन बाळगण्यात आले आहे.

वास्तविक उपरोक्त कलमानुसार ही जमीन मूळ स्वरूपात आणून तिचे मूळ प्रयोजन अर्थात कृषी प्रयोजनार्थ वापरात येणेबाबत आदेश पारित होणे अगत्याचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही. त्यामुळे विस्फोटके साठविण्याकरिता उभारलेली ही वास्तू कायम राहून ती मधून हा विस्फोटकांचा गोरख धंदा पुन्हा छुप्या पद्धतीने चालू राहील की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: