पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील परिसरामध्ये दि 21 व 22 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने निर्गुना नदी दुथडी भरून वाहल्याने बघ्याची नदी तिरावर दि 23 रोजी चांगलीच गर्दी जमली असली तरी या पुरामुळे नाथनगर व गोळेगाव राहिवाशी ग्रामस्थांचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला आहे.
पातूर तालुक्यातील निर्गुना नदी पंचक्रोशी मध्ये प्रचलित असून सदर नदीवर चोंढी निर्गुना प्रकल्प असल्याने पाऊस पडताच, प्रकल्पावरून येणारे पाणी प्रकल्पामध्ये साठत असल्यामुळे, नदीला त्वरित पूर येत नाही. परंतु सदर प्रकल्प आठवडा पूर्वी शंभर टक्के झाल्याने निर्गुना नदीला पाऊस पडताच पूर येणे सुरु झाले असून दि 21:22 रोजी जाम्ब परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे निर्गुना नदी दि 23 रोजी दुथडी भरून वाहली त्यामुळे नाथनगर व गोळेगाव ग्रामस्थांचा आलेगावाशी संपर्क तुटला असून त्यांना जवळपास 7 किमी अंतर प्रवास करून आलेगावाशी संपर्क साधावा लागतो.
विद्यार्थ्यांची पुरामुळे झाली कोंडी
चोंढी निर्गुना प्रकल्पाच्या विसर्गाचे पाणी आणि त्यामध्ये पुराचे पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे गोळेगाव नाथनगर येथील जवळपास 40 विद्यार्थ्यांना आलेगावात येण्यासाठी मानव विकासाची बस नसल्यामुळे, सदर विद्यार्थ्यांना 7 किमी पायी चालत शाळा गाठावी लागेल. यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होणार असून परीवहन मंडळ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन सदर विद्यार्थ्यांकरिता आलेगाव गोळेगाव अशी मानव विकास फेरीची तरतूद करावी अशी विद्यार्थी व पालकां कडून मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटला
निर्गुना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे, शेतकऱ्यांच्या शेतमाशागती कडे दुर्लक्ष होत असून शेत रखवाली करण्यासाठी पुराचा अडथडा शेतकऱ्यांना मोठा त्रास दायक ठरत असून वन्यप्राणी शेतपिकाचे नुकसान करणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.