Nijjar Murder Case : कॅनडामध्ये हिट स्क्वाडच्या तीन सदस्यांना काल अटक करण्यात आली आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी कॅनडाच्या सरकारने भारतीय एजंटांवर निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता.
हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी तपास यंत्रणेने तीन भारतीयांना अटक केली आहे. हे आरोपी कथित हिट स्क्वाड चे सदस्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर होती.
या लोकांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप होता
न्यायालयीन कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार यांच्यावर निज्जर प्रकरणात हत्या आणि कट रचल्याचा आरोप आहे. तसेच, अटक करण्यात आलेले तीन संशयित हे भारताचे नागरिक आहेत.
कॅनडा-भारत संबंधात तणाव
निज्जर हत्याकांडानंतर कॅनडा आणि भारताच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येसाठी भारतीय दलालांना जबाबदार धरले होते. यावर भारताने ट्रुडो यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की ट्रूडो यांनी यापूर्वीही अशी निराधार विधाने केली होती. कॅनडात अतिरेकी, फुटीरतावाद आणि हिंसाचाराला दिलेली राजकीय जागा पुन्हा एकदा त्यांच्या विधानातून दिसून येते.