सांगली – ज्योती मोरे
स्वावलंबी भारत अभियानांतर्गत देशात प्रत्येक जिल्ह्यात रोजगार सृजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नव उद्योजकांना हे केंद्र फायदेशीर ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजक घडतील, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.स्वावलंबी भारत अभियान, सांगली जिल्हा व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विलिंग्डन महाविद्यालयामध्ये रोजगार सृजन केंद्राचे उदघाटन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन चे रामकृष्ण पटवर्धन, माधव कुलकर्णी, भूपालसिंह सुल्ह्यान, कल्याणी गाडगीळ, नितीन देशमाने, विलास चौथाई, भास्कर ताम्हणकर, नगरसेविका सविता मदने, डॉ. रविकांत पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गाडगीळ म्हणाले, स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत देशात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. रोजगार सृजन केंद्रामधून नव उद्योजक, व्यावसायिक यांना मार्गदर्शन मिळेल.
या सृजन केंद्रा मार्फत नव उद्योजकाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सृजन डी.आय. सी., वित्तीय संस्था, सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था, विविध शासकीय, निमशासकीय व उद्योग घटका सोबत निगडित सर्व संस्थाचे या केंद्राच्या माध्यमातून समन्वयाने काम चालणार आहे.