Sunday, November 17, 2024
Homeराज्यना कामाचा ना काजाचा, वैरी अजित गटाचा… आमदार मिटकरीवर कार्यकर्ते नाराज…पक्ष वाढीत...

ना कामाचा ना काजाचा, वैरी अजित गटाचा… आमदार मिटकरीवर कार्यकर्ते नाराज…पक्ष वाढीत अडसर आणित असल्याचा आरोप…

आकोट – संजय आठवले

अकोला शहरातील सेंटर प्लाझा हॉलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यक्रमात त्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षातीलच धडाडीच्या युवा नेत्याच्या नियुक्तीला विरोध करून चर्चेची राळ उठवली आहे. या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई येथे होणार असून जिल्ह्यात मात्र “ना कामाचा ना काजाचा, वैरी अजित गटाचा” अशी आमदार मिटकरी यांची संभावना होत आहे.

वाचकांना ठाऊकच आहे कि, राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर घेतले. वास्तविक मिटकरी यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. त्यांचा लोकसंग्रह ही नगण्य आहे. परंतु तुकडोजी महाराज भजनी मंडळाच्या सानिध्याने त्यांना भाषण कला अवगत झाली. संभाजी ब्रिगेडच्या सहवासाने तिला धार मिळाली. त्याच माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केला. परिणामी प्रभावित झालेल्या अजित पवारांनी मिटकरींना थेट विधान परिषदेवर घेतले.

एका सामान्य परिवारातील कोणत्याही व्यक्तीने या संधीचे सोने केले असते. लोकसंग्रह वाढविला असता. पक्ष वाढविला असता. पण मिटकरींना अवदसा आठवली. आणि त्यांना “ग” ची बाधा झाली. त्यामुळे कालपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांना नमस्कार करणारा अमोल मिटकरी, आमदार होताच भूतकाळ विसरला. चालण्या, बोलण्या, वागण्यात बनावटी रुबाब आला. जवळ असलेली चार दोन माणसे तिही ह्या अहंकाराने दुरावली. स्वपक्षातही तीच गत. बाहेरच्यांना आकर्षित करणे तर दूरच उलट स्वपक्षीयांशीच दोन दोन हात करणे सुरू झाले.

त्यातच शिवा मोहोड या धडाडीच्या होतकरू युवक नेत्याशी मिटकरींचा खटका उडाला. याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली. प्रकरण-विकोपाला गेले. थेट अजित पवारांपर्यंत गेले. त्यांचे हस्तक्षेपाने हा वाद शमला. वास्तविक शिवा मोहोड व्यासंगी युवा नेता आहेत. त्यांना मोठा जनाधार आहे. अकोला मनपामध्ये ते दोनदा नगरसेवक राहिलेले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. महानंदचे संचालक आहेत. विशेष म्हणजे महानंदच्या निवडणुकीमध्ये खुद्द अजित पवारांनी त्यांना संचालक पदाची निवडणूक लढविण्यास सांगितले होते.

एखादा चाणाक्ष राजकारणी असता, तर त्याने अशा चलनी नाण्याला हाताशी धरून पक्षहित, स्वहित आणि कार्यकर्त्यांचे हित साधले असते. परंतु अस्सल राजकीय पिंडच नसल्याने आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांचेशी उभा दावा मांडला. त्यातच राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाली. त्यात शिवा मोहोड होते तिथेच थांबले. काही काळानंतर मात्र त्यांनी मुंबई मुक्कामी राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांचे समक्ष अजित गटात प्रवेश घेतला. हा प्रवेश घेतेवेळी त्यांनी आपल्याला आकोट मतदार संघातून निवडणूक लढावयाची असल्याचे सुतोवाच केले.

झाले. येथेच दुसरी ठिणगी पडली. क्षणार्धात निखार्‍यावर चढलेली राख झटकली गेली. मिटकरीच्या दुखऱ्या भागावर पुन्हा प्रहार झाला. त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. कारण आकोट मतदार संघातून लढण्याची मिटकरी यांचीही सुप्त इच्छा आहे. त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. परंतु शिवा मोहोडच्या घोषणेने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. आणि अकोला शहरातील सेंटर प्लाझा हॉलमध्ये मिटकरींचा बांध फुटला.

या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री तथा अकोला जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी अजित गटाचे प्रांत युवा अध्यक्ष सुरज चव्हाण हे उपस्थित होते. त्यानिमित्ताने होणाऱ्या बैठकीत अजित गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे शिवा मोहोड यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र बहाल करणार होते. परंतु ही घोषणा होताच आमदार मिटकरी यांनी थयथयाट केला. या नियुक्तीचा निषेध करून आपण शिवा मोहोड यांची अजित पवारांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

मिटकरींच्या ह्या पवित्र्याने बैठकीतील वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले. त्यावेळी सुरज चव्हाण यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाचा फैसला मुंबईत होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर बैठक पार पडली. परंतु झाल्या प्रकाराबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सध्या अजित पवार अडचणीत आहेत.

त्यांना मिळेल तितकी रसद हवी आहे. आपला ठसा उमटविणे करिता त्यांना धडाडीचे व लोकमान्य माणसे हवी आहेत. अशा स्थितीत अशी माणसे मिळत असताना त्यांना छातीशी कटाळण्याऐवजी दुधात मिठाचा खडा टाकून मिटकरी त्या माणसांना दूर ढकलित आहेत यावरून ते पक्ष वाढीला विरोध करीत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

त्यामुळे स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतही नीटपणे सांभाळू न शकणारा मिटकरी हा माणूस “ना कामाचा ना काजाचा, वैरी अजित गटाचा” असा असल्याची चर्चा पसरू लागली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: