Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनबालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निलम शिर्के-सामंत याची एकमताने निवड...

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निलम शिर्के-सामंत याची एकमताने निवड…

कार्याध्यक्षपदी राजू तुलालवार तर प्रमुख कार्यवाह सतीश लोटके

मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था ‘बालरंगभूमी परिषद’ मुंबईची सर्वसाधारण सभा पुणे येथे संपन्न झाली. सभेने सन. २०२४-२९ साठी एकमताने कार्यकारी मंडळाची निवड करत अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांची अध्यक्षपदी, तर राजीव तुलालवार- कार्याध्यक्ष, सतीश लोटके-प्रमुख कार्यवाह, दीपा क्षीरसागर-उपाध्यक्ष, दीपक रेगे-कोषाध्यक्ष, आसेफ (अन्सारी) शेख व दिपाली शेळके सहकार्यवाह या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून ॲड.शैलेश गोजमगुंडे- लातूर, आनंद खरबस- सोलापूर, वैदेही चवरे- सोईतकर- नागपूर, अनंत जोशी- अहमदनगर , आनंद जाधव – नाशिक, योगेश शुक्ल – जळगाव, धनंजय जोशी- सांगली , त्र्यंबक वडसकर – परभणी, नंदकिशोर जुवेकर – रत्नागिरी यांची निवड करण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी निवडणूक अधिकारी म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी पार पाडली. सर्वसाधारण सभेची सुरुवात मागील सभेचे इतिवृत्त वाचून करण्यात आली.

त्यानंतर विषयपत्रिकेनुसार सभेचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर माजी अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या मागील कार्याचा आढावा सभेपुढे मांडला. त्यासोबतच पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि यात १७ कार्यकारी मंडळ सदस्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा निलम शिर्के-सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला.

बालरंगभूमी चळवळी विषयक सभेत सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा निलम शिर्के- सामंत यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये त्यांनी बालरंगभूमी परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली. ज्यामध्ये स्पर्धा किंवा बालरंगभूमीवर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी बाल कलावंतांना सक्षम करण्याच्या हेतूने अभिनयासोबतच बाल कलावंतांना रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, दिग्दर्शन याचेही प्रशिक्षण देण्यात यावे, यावर भर देण्यात आला.

बालरंगभूमी परिषद केवळ नाट्यकलेपुरतीच मर्यादित न राहता इतर ललित कला प्रकारांचा समावेश त्यामध्ये व्हावा, या हेतूने भविष्यात बालरंगभूमी परिषदेचे कार्य राहील असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक शाखा सक्षम व्हावी या हेतूने कार्यभार स्वीकारताच काही कालावधीतच संपूर्ण विभागाचा दौरा करण्याचा मानस त्यांनी दर्शविला.

बालरंगभूमी परिषदतर्फे वर्षातून एकदा तरी एका बालनाट्याची निर्मिती व्हावी या हेतूने प्रत्येक शाखेने प्रयत्न करायला हवा, प्रत्येक शाखेचं कार्यालय असावे, विविध पारितोषिक विजेत्या तसेच उत्कृष्ट अशा बालनाट्य संहिता एकत्रित करून त्या निशुल्क सर्वांना उपलब्ध कशा करून देता येतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, बालरंगभूमीसाठी सातत्याने बालनाट्य चळवळ राबविणाऱ्या किंवा बालरंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या होतकरू कलावंतांचा, जेष्ठाचा सन्मान बालरंगभूमी परिषदेतर्फे करण्यात यावा, बालनाट्य संमेलनाची सुरुवात करण्यात यावी यासारख्या अनेक बाबींचा समावेश आपल्या मनोगतात करीत हे संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आपण स्वतः एक कलावंत व बालरंगभूमी परिषद सदैव कार्यरत राहील असे अध्यक्ष निलम शिर्के-सामंत यांनी सांगितले. संपूर्ण वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

त्याबरोबरच सर्व उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निधी उभा करणे यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व सभासदांच्या विचारांचे स्वागत करत त्यासंबंधी नक्कीच निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष निलम शिर्के-सामंत यांनी सांगितले. प्रार्थनेने सर्वसाधारण सभेची सांगता झाली सदर सर्वसाधारण सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध शाखांमधील कार्यकारिणी सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले , अजित भुरे व सर्व नियामक मंडळ सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: