आज रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा गोळ्या घालून खून…
सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 100 फुटी वरील माने चौक परिसरात आज रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी नालसाब मुल्ला याच्यावर हल्ला करत धारदार हत्याराने आणि गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली हे घटनास्थळी हजर झाले असून तपासात सुरुवात करण्यात आली आहे.
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर निवांत बसले होते.
यावेळी चार अज्ञात इसम त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी मुल्ला यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यामुळे मुल्ला यांनीही या अज्ञातांना झापण्यास सुरुवात केली. त्यावेळी या अज्ञातांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले. त्यामुळे मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
त्यामुळे मुल्ला यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुल्ला यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला. पूर्व वैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मृत मुल्ला याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.तेली यांनी सांगितले.घटनास्थळी सात ते आठ पुंगळ्या मिळून आले असून अंदाजे तीन ते चार हल्लेखोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते.