नांदेड – महेंद्र गायकवाड
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने नवभारत साक्षरता निरक्षर सर्व्हेक्षण सह अन्य सर्वेक्षणाचे कार्य कार्यरत शिक्षकांना देण्यात येवू नये या मागणीचे निवेदन ईमेल द्वारे दिपक केसरकर शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्री, रणजितसिंह देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महा.राज्य मुंबई यांना नुकतेच पाठविण्यात आले आहे.
निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील ,राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या स्वाक्षरी केल्याची माहिती राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे,राज्य उपाध्यक्ष जी .एस .मंगनाळे , राज्य संघटक अशोक मोरे,जिल्हा अध्यक्ष जे.डी.कदम, जिल्हा सरचिटणीस नागनाथ गाभणे यांनी दिली.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ च्या प्रारंभालाच प्राथमिक शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामाचा एवढा व्याप लावून ठेवला आहे की त्यांना विदयार्थ्यांना शिकवायलाच वेळच मिळत नाही. हे पाहता शिक्षकांची नियुक्ती ही शिकवण्यासाठी नसून कागदोपत्री अहवाल व सर्व्हेक्षण यासाठीच आहे काय कशी समाजाची धारणा होत आहे.
सत्राच्या पहिल्या महिण्यातच विदयार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती, सेतू अभ्यासक्रम पुर्व चाचणी, उत्तर चाचणी, निपुन भारत स्तरनिश्चिती पायभूत चाचणी हे सर्व पार पडले आणि आता निरक्षर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढयाच कालावधीत कॉन्व्हेंट शाळांचा विचार करता त्यांचा अभ्यासक्रम बराच पुढे गेलेला दिसून येत आहे.
विदयार्थ्यांना तात्पुरते शिकवण्यासाठी जर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करता येते तर सर्व्हेक्षण सारख्या कामासाठी त्यांची व सुशिक्षित बेरोजगारांची नियुक्ती करता येवू शकते अशी कामे नियमित शिक्षकांना दिल्यामुळे विदयार्थ्यांच्या शिकण्यावर याचे वाईट परिणाम होत आहेत.
विदयार्थी गुणवत्ता हे जर आपण अंतिम ध्येय मानतो तर विदयार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुर्ण वेळ देता आला पाहिजे तरच ते शक्य आहे. त्यांचा शिकवण्याचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अनेक प्रकारच्या अशैक्षणिक कामात जात असल्यामुळे दर्जेदार शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत आहेत असे संघटनेचे ठोस मत आहे.
करीता या समस्येचा गांभिर्याने विचार करून नुकतेच दिलेले निरक्षर सर्व्हेक्षण चे काम शिक्षकांकडून काढून अन्य अशैक्षणिक कामे किती आहेत यासाठी एका समितीचे गठण करून ती कामे कमी करणेसाठी ठोस प्रयत्न करावे कारण या अशैक्षणिक कामामुळे समाज व शिक्षकांमध्ये मोठा असंतोष दिसून येत आहे यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनासह आमच्या संघटनेच्या वतीने अशा अशैक्षणिक बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.