रामटेक – राजु कापसे
रामटेक:- पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नेचर युथ टीम (विदर्भ) यांनी चारगाव रामटेक येथील सनराईस इंटरनॅशनल स्कूलला २० वृक्षांची भेट दिली. या उपक्रमामागील प्रेरणा होती राहुल गोरीकर (रा. मनसर) यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नेचर युथ टीमला भेट दिलेले २० वृक्ष. झाडे म्हणजे पृथ्वीचे श्वास आहेत.
त्यांनी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, हवा, आणि औषधी अशा अनेक मूलभूत गरजा पुरवल्या आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही चिंतेचा विषय आहे. भविष्यात ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नेचर युथ टीमच्या या प्रयत्नामुळे पर्यावरण रक्षणाची प्रेरणा मिळते. सनराईस शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. नेचर युथ टीमचा हा उपक्रम ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाला अधिक बळ देतो. वाढत्या प्रदूषणाच्या काळात झाडांची लागवड ही काळाची गरज आहे. नेचर युथ टीमचे हे योगदान समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.