या घडीला संपूर्ण देशभर घर घर झेंडा अभियान राबविण्यात येत असून देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आकोट पालिकेद्वारे राष्ट्रीय ध्वज विक्रीस प्रारंभ करण्यात आला आहे. पालिकेद्वारे विकण्यात येणाऱ्या या ध्वजाचे मूल्य 21 रुपये ठेवण्यात आले आहे. अतिशय अल्पमुल्यात हा ध्वज पालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.
महाव्हाईसचे नागरिकांना आवाहन
अकोट शहरात बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाची विक्री करण्यात येत आहे. राष्ट्रीय ध्वज विकत घेताना त्याचा अवमान होऊ नये याकरिता काही बाबींची काळजी घेणे अगत्याचे आहे. आता विक्रीस आलेले राष्ट्रध्वज प्रमाणित आहेत याची खात्री करून घ्यावी. वास्तविक राष्ट्रध्वजाचा प्रमाणित आकार निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र त्याच आकारात हे ध्वज मिळतील याची शाश्वती नाही. कमी अधिक आकारातील ध्वज विक्रीसाठी आलेले आहेत. परंतु त्यासाठी रुंदीच्या दीडपट लांबी असलेले ध्वज हे योग्य ध्वज मानल्या जातात. लांबी रुंदी समान असलेल्या ध्वजास राष्ट्रीय ध्वजाची मान्यता नाही.
याशिवाय राष्ट्रध्वज तिरपा,फाटलेला नसावा. ध्वजाच्या पांढऱ्या रंगातील अशोक चक्र बरोबर मध्यभागी असावे. ध्वजातील तिन्ही रंगांचे पट्टे समान आकाराचे असावेत.असे नसल्यास ध्वजाची अवमानना होते. नागरिकांना हे सांगण्याचे प्रयोजन असे की, आता विक्रीस आलेल्या ध्वजांचे अवलोकन केले असता त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. असंख्य ध्वज रुंदीच्या दीडपट लांबी असलेले नाहीत.त्यांच्या आकारात मोठी विसंगती आहे. अनेक ध्वजातील तीन रंगांचे पट्टे तिरपे आहेत. असंख्य ध्वजांमधील अशोक चक्र डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकलेले आहे. असे ध्वज फडकविल्यास ती ध्वजाची अवमानना होते. त्यामुळे नागरिकांनी ध्वज विकत घेताना तो पारखून घेण्याची काळजी घ्यावी. जेणेकरून राष्ट्रध्वजाचा संपूर्ण सन्मान राखल्या जाईल.