अतुल दंढारे — नरखेड
ता.19
नरखेड तालुक्यात २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. राजकीय पक्षाने समर्थकामार्फत मोर्चेबांधणी सुरू केली. इच्छुक उमेदवार मतदारांच्या सेवेत लागला. पाच वर्षांपूर्वी २२ पैकी बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जात घेतल्या होत्या. परंतु परिस्थिती बदलली आहे. राज्यात सत्तातर झाले. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे गेली वर्षभर राष्ट्रवादी नेतृत्व भरकटले आहे. त्यांचे पुत्र सलील देशमुख सध्या राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहे. परंतु दुसरीकडे प्रस्थापिता मध्ये त्यांच्या नेतृत्वामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम व राज्यात सत्तांतरामुळे भाजप मध्ये वाढलेला उत्साह याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चा गड असलेल्या तालुक्यात खिंडार तर पडणार नाही अशी शंका आहे.
नरखेड तालुक्यात २२ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत . सरपंच जनतेतून निवडायचा असल्यामुळे भविष्यातील विधानसभेची निवडणूक लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. विद्यमान जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध, आ अनिल देशमुख , माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चौव्हन, पंचायत समिती सदस्य अरुना नंदकिशोर मोवाडे यांची लोहरी सावंगा, वडविहिरा, बेलोना, आग्रा यासह बंडू उमरकर यांचे वर्चस्व असलेली मेंढला ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ने ३ जिल्हापरिषद व आठ पैकी आठही पंचायत समिती जागांवर एकतर्फी विजय मिळविला होता. परंतु आरक्षणामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी ने दोन पैकी एक व पंचायत समितीच्या दोन्ही जागा गमावल्या. त्यावर भाजपाने विजय मिळविला. त्यानंतर राज्यात सत्तातर झाले. राज्यातील सत्तेचा ग्रामपंचायत निवडणुकीवर नेहमीच प्रभाव पडलेला आहे. या सर्व बाबी विचारात घेतल्या तर यावेळी राष्ट्रवादीची वाट खडतर दिसत आहे. राष्ट्रवादीचा गड असलेल्या नरखेड तालुक्यात खिंडार पडेल की गड राखण्यात यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल.