राजु कापसे
रामटेक
श्री सदगुरु नारायण स्वामी आणि श्री दत्तगुरु बालयोगी छोटू बाबा पुण्यतिथी महोत्सव उद्या दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रामटेकपासून ३ किमी अंतर असलेल्या अंबाळा येथिल नारायण टेकडीवर सुरू होणार आहे. 26 डिसेंबर रोजी उत्सवाची सांगता होईल.
महोत्सवा दरम्यान दररोज सकाळी ८ ते ९ श्री सद्गुरू नारायण स्वामी संजीवन समाधीचा अभिषेक, ओम नमो नारायण संगीतमय अखंड मंत्रोच्चार, भाविक आणि पाहुण्यांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ महाप्रसादाची व्यवस्था असणार आहे. दररोज सकाळी ११ वाजेपासून आनंद जीवनाची गुरुकिल्ली, कायरोथेरपी, अॅक्युपंक्चर, फिजिओथेरपी, स्त्री आरोग्य, रक्तदान व थायरॉईड तपासणी, नेत्र तपासणी व चष्म्याचे वाटप, मधुमेह व रक्त तपासणी करण्यात येणार आहे.
डॉक्टरांकडून वेगवेगळ्या दिवशी दबाव व्यवस्थापन मार्गदर्शन व उपचार असतील. २६ डिसेंबर रोजी उत्सवाची सांगता होऊन महाप्रसाद होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी येथे अध्यात्म साधना केली आणि सद्गुरू नारायण स्वामी महोत्सव सुरू केला. बालयोगी छोटू महाराज यांनी येथे अध्यात्म साधून तुकडोजी महाराजांच्या परंपरेचे पालन केले.
हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सुश्री साध्वीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. छोटू महाराजांच्या संस्कारामुळे हजारो भक्त शिस्तबद्ध आणि आत्मनियंत्रित जीवन जगत आहेत. श्री सदगुरु नारायण स्वामी आणि श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा समाधी दर्शनासाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बालाघाट, दुर्ग आदी भागातील भाविकांची उपस्थिती राहात असते.