अकोल्याच्या नृत्यसाधनेचा दिल्लीत सन्मान…
अकोला – नुकताच नवी दिल्ली येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त नवी दिल्ली येथे विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या देशभरातील महिलांचा सन्मान करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा सोहळा पार पडला आहे. ‘टिम झेनिथ’ने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यात अकोल्याचाही विशेष गौरव करण्यात आला.
अकोल्यातील प्रसिद्ध नृत्यांगणा नंदिनी संजय बोडसे यांना ‘पंडित बिरजू महाराज राष्ट्रीय नृत्य पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. नंदिनी ही अकोल्यातील नव्या पिढीतील कथ्थक आणि क्लासिकल नृत्यांगणा आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर अनेकदा अकोल्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. यासोबतच अकोल्यातील प्रसिद्ध नृत्य शिक्षक आणि कोरियोग्राफर हिमांशू विश्वकर्मा यांना ‘डांस आयकॉन ऑफ इंडिया अवार्ड 2023’ ने सन्मानित करण्यात आलं.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुनिता दुग्गल, माजी मंत्री सुनिल भराला, पद्मश्री डॉ. शोभना नारायण, सुरेखा लमटोरे, राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे सदस्य सिद्धेश्वर कानेटकर, प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रतिमा भौमिक, खासदार नवनीत राणा यांनी शुभेच्छा देत पुरस्कार विजेत्यांचे कौतूक केलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या या विशेष सन्मानाबद्दल अकोल्यात नंदिनी बोडसे आणि हिमांशू विश्वकर्मा यांचं कला आणि सांस्कृतिक विश्वातून मोठं कौतूक होत आहे.