महेंद्र गायकवाड
नांदेड : ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज लागलेल्या निकालात बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असून, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातही कमळ फुलले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील ९१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान झाले. झालेल्या मतदानाची मतमोजणी आज दि. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील ८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते, पैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजपाने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. कंधार तालुक्यातील हनुमंतवाडी, रामानाईक तांडा तर लोहा तालुक्यातील उमरा, गवंडगाव, घोटका, लांडगेवाडी, हिराबोरी तांडा यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील किनवट, माहूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. यातील ५९ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय झाला आहे. भारतीय जनता पार्टीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आ. भीमराव केराम यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली किनवट-माहूरमध्ये भाजपाचे कमळ फुलविले आहे. टाकळी, डिग्रीधानोरा, सत्तीगुडा, मांडवी आदी ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतही कॉंग्रेस हद्दपार होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यांचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. केराम, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह भाजपातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया देतांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन आणि पारदर्शक सरकार यामुळे लोककल्याणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शेवटच्या घटकाचा विकास हाच भाजपाचा ध्यास असल्याने ग्रामीण भागातील जनतेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व हवे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या चाव्या भाजपाकडे दिल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने आपल्यास निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवत विकासाची कामे करून तळागाळापर्यंत समृद्धी पोहोचवावी, असे आवाहन केले आहे.