नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड – निवडणूक काळामध्ये वार्तांकन करतांना वस्तुस्थिती सोडून दिशाभूल करणारे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधीवर मुखेड येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक काळात ‘फेक न्यूज ‘,बाबतचा जिल्हयातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाची नाहक बदनामी करणा-या वृत्ताला वस्तुनिष्ठ नसलेली बातमी ( फेक न्यूज ) असे परिभाषीत केले आहे. तरी देखील एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने चुकीची बातमी प्रकाशित केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाची विनाकारण बदनामी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत 91-मुखेड विधानसभा मतदारसंघात 29 मार्च 2024 रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाबाबत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कोणतेही माहितीची खातरजमा न करता एका वृत्तपत्रामध्ये प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच्या रिकाम्या खुर्चीचे फोटो तसेच प्रशिक्षणास अनुपस्थित असणा-या कर्मचा-यांची पाठराखण प्रशासन करीत असल्याचे चुकीचे वृत्त दिले होते.
(प्रशिक्षणास अनेक कर्मचाऱ्यांची दांडी तर अशा कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण ) त्यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ (91-मुखेड) यांच्याकडून कोणतेही खातरजमा न करता वस्तुस्थितीला सोडून वृत्त प्रकाशित केल्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम (भा.प्र.से) यांनी पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा दाखल केला आहे. वृत्तपत्रांनी निवडणूक प्रक्रिया संदर्भात वृत्तलेखन करताना, इलेक्ट्रॉनिक्स व कोणत्याही माध्यमांवर बातमी दाखवताना संबंधित विभागामार्फत खातरजमा करावी, दुसरी बाजुही मांडावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फेक न्यूज व निवडणूक आयोग
तथ्यहिन बातमी संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी 2024 च्या मिडिया मॅटर हॅन्ड बूकमध्ये 9.1 या सत्रामध्ये आयोगाच्या संदर्भात अपप्रचार पसरविणा-या तथ्यहिन बातम्यांसंदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशिष्ट कालमर्यादेत या वृत्ताचे खंडन करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी तातडीने ही कार्यवाही केली असून संपादकांनी देखील संबंधीत तालुका प्रतिनिधीला समज देण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील गुन्हा मुखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.