नांदेड – महेंद्र गायकवाड
16-नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली असून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा 59 हजार 442 मतांनी पराभव केला आहे.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना 5लाख 28 हजार 894 मते मिळाली तर प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना 4 लाख 69हजार 452 मते मिळाली.
नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. लोकसभेसाठी विविध पक्ष व अपक्ष मिळून 23 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुख्य लढत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण व भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यात झाली होती. तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला एका विधानसभासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी झाली.एकूण 26 फेऱ्या झाल्या असून पहिल्या फेरीत भाजपच्या चिखलीकर यांनी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी दुसऱ्या फेरी पासून ते शेवटच्या फेरी पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवत 59 हजार 442 मतांनी चिखलीकर यांचा पराभव केला आहे.