नागपूर – राजू कापसे
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील माहुली येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने अखिलेश हायस्कूलच्या प्रांगणात दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवाची सुरुवात सकाळी गावात मिरवणूक काढून खन व मूठ पूजनाने करण्यात आली.
या विशेष कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंचाच्या कलाकारांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. विदर्भातील विविध गावांमध्ये नागदिवाळी महोत्सवानिमित्त समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सादर करण्याची परंपरा या कलामंचाने जोपासली आहे, अशी माहिती संचालक विलास चौधरी यांनी दिली.
आदिवासी माना समाजाच्या चालीरीती, संस्कृती जतन करण्याबरोबरच समाजाला संघटित करणे, इतिहासाची जाण वाढवणे आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. तसेच, फुले, शाहू, आंबेडकर, बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वानुसार समाज प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
सध्याच्या परिस्थितीत आदिवासींचे घटनात्मक हक्क, अधिकार, आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करत लोकगीते, लोकनृत्य व पथनाट्याच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे.
या कार्यक्रमात विलास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कमलाकर कापटे, शालिनी सहारे, सुनील नन्नावरे, मंगेश जिवतोडे, सुरज राजनहिरे, अमोल श्रीरामे, आकाश नन्नावरे, प्रतीक्षा चौधरी, पायल श्रीरामे, सलोनी चौधरी आणि सौरभ दडमल यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.