नरखेड – 13
Nagpur – मोठ्या भावावर पोकसो अंतर्गत असलेल्या गुन्ह्यातील साक्ष फिरविण्यास साक्षदाराने मनाई केल्याने लहान भावाने साक्षदाराचा खून केल्याची घटना नरखेड तालुक्यातील बेलोना येथे सायंकाळी ७ वाजता घडली. संशयित आरोपी पळून जात असताना मोवाड- जलालखेडा रस्त्याने नाकाबंदी करून जलालखेडा पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. केशव मस्के ( पहेलवान) वय ५०रा. बेलोना असे मृतकाचे नाव आहे.
मृतक शेतातून दुध घेऊन त्याचे वाटप करीत घरी येत असताना बस स्टँड परिसरात माजीउपसरपंच ललित कालमेंघ यांच्या शेताच्या गेट समोरच ही घटना घडली. मृतकाच्या डोक्यावर मागच्या बाजूने मार असल्याचे कळते. पिस्तूल मधून गोळी झाडून खून झाल्याची नागरिकांत चर्चा आहे. तीन वर्षांपूर्वी बेलोना येथील आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बेलोना येथील प्रेमराज कळंबे याला पोकसो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.
मृत केशव मस्के हा त्या प्रकरणात साक्षीदार आहे. त्याने आपली साक्ष फिरवावी म्हणून कळंबे परिवाराकडून दबाव टाकण्यात येत होता. काही महिन्यांपूर्वी केशव मस्के याचा मुलगा निखिल मस्के विरुद्ध प्रेमराज कळंबे याच्या तीन चार वर्षीय मुलीची छेड काढण्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला अटकही झाली होती. शनिवारी बेलोना येथील बजरंग बली मंदिरात कळंबे व मस्के कुटुंब व काही मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंबात समेट घडवून आणण्याबाबत बैठक झाल्याचे कळते . त्या बैठकीत मृतक केशव मस्के याने माघार घेण्यास नकार दिल्यानंतर प्रेमराज कळंबे याचा लहान भाऊ भारत कळंबे याने केशव मस्के याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली असल्याची चर्चा आहे.
केशव मस्के बाबत माहिती कळताच गावकरी व पोलिसांचा संशय सर्वप्रथम भारत कळंबे याच्यावर गेला . पोलिसांनी सर्वत्र सूचना देऊन नाकेबंदी केली असता भारत कळंबे याला मोवाड वरून जलालखेडा येथे जाताना नाकेबंदी दरम्यान ताब्यात घेतले. संशयित आरोपी कडे नरखेड पोलीस चौकशी करीत असून चौकशी अंती पूर्ण प्रकरण समोर येईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहे.