Sunday, December 22, 2024
Homeविविधप्रा अविनाश डोळस सर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्ताने दैनिक व्रुत्तरत्न सम्राट मध्ये प्रकाशित...

प्रा अविनाश डोळस सर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्ताने दैनिक व्रुत्तरत्न सम्राट मध्ये प्रकाशित माझा लेख !…प्रा अविनाश डोळस सरांच्या सम्यक द्रुष्टीतून..!

आनंद दिवाकर चक्रनारायण, मो 9422713727

प्रा अविनाश डोळस सर म्हणजे एक चालता बोलता ईनसायक्लोपिडिया.जगातल्या कुठल्याही विषयांवर चर्चा करण्यासाठी नेहमीच तत्पर ! राजकारण, समाजकारण, धर्मकारण, धम्मचर्चा, सांस्क्रुतिक, साहित्य, नाट्य, समिक्षा, आंतरराष्ट्रीय घडामोडी,पत्रकारिता, कथा, थिएटर असा एकही विषय नाही की त्याला प्रा अविनाश डोळस सर यांनी स्पर्श केलेला नाही ! कुठल्याही गोष्टींवर अडचण आली की प्रा अविनाश डोळस सर हें हक्काचं माहेरघर !

बारा महिने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस नेहमीच ऑनलाईन ! प्रत्यक्ष भेट , लँडलाईन फोन , मोबाईल , एस एम एस , व्हाटसअप् , ई मेल , फेसबुक , ट्विटर , आदी विविध संवाद माध्यमांद्वारे सर सतत संपर्कात ! आज तो संपर्क कुठेतरी हरवल्याचे सरांच्या संपर्कयादीतील सर्वच जणांना जाणवत आहे. सरांचा आज प्रथम स्म्रुतीदिन (11नोव्हेंबर ) ! सर या जगातून इतक्या लवकर एग्ज़िट घेतील असे कुणालाही वाटले नव्हते ! पण सरांनी एग्ज़िट घेतली हें शाश्वत अरीय सत्य आहे आणि नोबल ट्रुथ (Noble Truth) आहे !

सर आज आपल्यात शरीररूपाने जरी नसले पण त्यांचा सहवास , त्यांची चर्चा , त्यांचे साहित्य , त्यांच्या समीक्षा , त्यांची नाटके , त्यांच्या एकांकिका , त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे , त्यांचे राजकीय फट्कारे , त्यांचा मिलिंद कॉलेजातील वर्गातला मराठीचा तास , त्यांच्यासोबतचा प्रवास , सोबतच केलेली भटकंती , आणि असे अनेक नानाविध पैलू आपण सर्वानीच जपून ठेवले आहेत ! अशी माणसे वारंवार निर्माण होत नसतात ! त्यांना जिवंतपणी आणि त्यांच्या शारीरिक म्रुत्यूनंतरही त्यांच्या अनुयायांनी जपावे लागते !

तरच ती माणसे अतीत अनागत आणि पचुपन्न कालात वंदनीय ठरतात ! जसे की तथागत बुद्ध सुद्धा वंदनीय आहेत आणि बाबासाहेबही ! हजारो वर्षे अजरामर राहील अशी कुंजी हें महामानव देऊन गेलेत आपल्यासाठी ! त्या कुंजीची योग्य पद्धतीने फोड करून वाटणी करण्याचे महत्तम कार्य प्रा अविनाश डोळस सरांनी केले ! बुद्ध आणि बाबासाहेब अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत समजवून सांगितले . सोबतच त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी अनेक अनुयायी निर्माण केलेत ! आपल्या लेखणीतून मराठी कथेला एक नवा आयाम देऊन शोषित पीडितांच्या “मराठी दलित कथा” लिहिल्या !

धर्म आणि धम्म या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर” महासंगर ” लिहून “धम्म म्हणजे नीति आणि नीति म्हणजेच धम्म “या बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अजरामर धम्मवाक्याला दुजोरा दिला ! आंबेडकरी चळवळीवर भाष्य करतांना तिला परिवर्तनाचे कसे संदर्भ आहेत हें सामान्य जणांना पटवून दिले ! संघ परिवारावर त्यांच्याच मैदानात जाऊन “माझ्या ब्राम्हण समाजाकडून अपेक्षा “या विषयांवर बोलतांना केवळ त्यांच्यासाठी स्टेजवर गोड गोड न बोलता सत्य कथन करीत त्यांच्या रमण्यावर परखड भाष्य केले !

विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर राजकीय मत मांडताना समोरच्या राजकीय विश्लेषकांवर वैचारिक प्रगल्भतेच्या जोरावर त्यांचे चुकीचे मुद्दे खंडित करण्याचे कार्य केले ! सर्वसामान्य माणसालाही गाडी थांबवून विचारपूस करणारे आणि रस्त्यावरच्या टपरीवर त्याच्या आग्रहाखातर चहा पिणारे डोळस सर पंचतारांकीत हॉटेलातल्या आपल्या विद्यार्थी असणाऱ्या वेटरशी त्याचप्रमाणे वागत असत ! सतत वाचन , चिन्तन , मनन , अभ्यास , नवसर्जनशीलता , भाषण , प्रवास आणि परत शासकीय नोकरी यांत नक्कीच सरांचे प्रक्रुतिकडे दुर्लक्ष झाले असेल हें सत्य आपण नाकारू शकत नाही !

67 व्या वर्षी या जगाचा निरोप घेणे हे बव्हंशी बरोबर नाही ! अनेक मित्र आणि नातेवाईक डॉक्टर असूनसुद्धा सर त्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा ते सरांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरले असेच आपणांस म्हणावे लागेल ! माणूस शरीराने मरतो पण त्यांचा ध्वनी अमर राहतो असे प्रख्यात विद्रोही कवयत्री डॉ प्रतिभा अहिरे यांनी म्हटले आहे ! डोळस सर शरीराने आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाज आजही आपल्या कानात , आपल्या मनात , आपल्या हृदयात , आपल्या मेंदूतील मोटर सिस्टिममध्ये आपण स्टोअर करून ठेवला आहे !

तसेच तो प्रत्यक्ष आवाज आज आपण समाजमान्य पावलेल्या माध्यमांवर ऐकू शकतो .उदा .(फेसबुक , यू ट्यूब ) एखाद्या बातमीची हेडलाईन कशी असावी ते बातमीत मजकूर काय काय असावा इथपासून ते लेखाची मांडणी , अग्रलेखाचे मुद्दे , जाहिरातीची आकर्षकता , वर्तमानपत्राच्या पानांची रंगसंगती , बातमीचा फॉन्ट आदी बाबतीत डोळस सर एकप्रकारे संपादकीय जबाबदारी पार पाडताना दिसायचे ! याचे कारण असे की त्यांनी काही काळ अनंत भालेराव यांच्या मराठवाडा दैनिकात बातमीदार म्हणून काम केलेले होते !

तसेच माझ अस्तित्व हें लघु नियतकालिकही काही काळ चालवले ! आंबेडकरी चळवळीत स्कॉलरशिप वर शिकणारा विद्यार्थी डॉ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतो आणि शिकत असतांनाच दलित युवक आघाडी स्थापन विद्यार्थी चळवळीचे नेत्रुत्व करतो ! आणि संपुर्ण मराठवाडा आपल्या आंदोलनाने दणाणून सोडतो ! पुढे याच मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करतो ! याच काळात मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून संपूर्ण मराठवाड्यात दंगल उसळते !

ठिकठिकाणी गावागावात बौद्धांच्या घरांवर बहिष्कार टाकल्या जातो ! सार्वजनिक पाणवठ्यावर बौद्धांनी पाणी पिवू नये म्हणून अटकाव केल्या जातो ! यावेळी प्रा अविनाश डोळस सर , प्रा एस के जोगदंड , प्रा माधव मोरे , प्रा विश्वप्रकाश सिरसट आदी संपुर्ण मराठवाड्यात गावागावात फिरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिवाचे रान करतात ! खळवट निमगाव ता माजलगाव जी बीड येथे एक गाव एक पाणवठा योजना राबवतात ! बाबासाहेबांचे नातू अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर भारतीय रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करीत असतांना दलित युवक आघाडी त्यात विलीन करतात आणि भारीप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय प्रवासातील एक सच्च्या वाहकाची भूमिका बजावतात !

प्रा अविनाश डोळस सर यांना वाटले असते तर ते कधीही पी एचडी मिळवून एखाद्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले असते वा एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू पद मिळवू शकले असते किंवा एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषवु शकले असते ! याही पुढे जावून केंद्र सरकारचा पद्मभूषण वा पद्मश्री वा साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळवू शकले असते ! पण ते त्या भानगडीत कधीच पडले नाहीत ! त्यांना कुणाची शिफारस अजिबातच आवडत नसे ! ते नेहमीच सर्वसामान्य लोकांना घेऊन राहिले ! तसा त्यांचा गोतावळा हा जातीविहिन समाजरचना मानणारा (डीकास्ट सोसायटी )होता !

या चळवळीची मांडणी करतांना डोळस सर नेहमी म्हणत असत “What is A purpose of Dhamma ? Dhamma’s purpose is nothing but reconstruction of the world.” ” धम्माचे प्रयोजन काय आहे ?” “धम्माचे प्रयोजन हें जगाची पुनर्रचना करणे हें आहे !” तर सर नेहमीच या तत्वज्ञानाला समोर ठेवून जगले ! जसे बोलले तसे वागले ! एहिपस्सिको :या ! पहा ! पटलं तर स्वीकारा !नेहमीच तथतेच्या :सत्यतेच्या धम्म पथावर चालले !

तिसरन पंचशील पाळून अरीय अट्ठागिक मार्गाने क्रमण करीत दहा पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत करीत बावीस प्रतिज्ञाही पाळल्या ! शेवटी अचानकपणे मिलिंद महाविद्यालयाच्या धम्मवाटेने नागसेनवनातून शरीरातल्या बदलांना साक्षी भावनेने बघत बघत सिद्धार्थ उद्यानातील तथागत बुद्धमुर्तीला स्मरून आपल्या श्वासोच्छवासला अखेरचा श्वास या आसमंताच्या स्वाधीन करून आपला देह प्रुथ्वी , आप , तेज , वायु , चित्त या पंचतत्वात विलीन केला !

तसं हें दुख पचवणे कठीणच ! पण शेवटी तथागत सम्यक संबुद्धांचा सिद्धांत , जीवन हें अनित्य आहे , नश्वर आहे , भंगुर आहे ! मानवी शरीर हें मरणधर्मीय आहे ! ज्याचा जन्म आहे त्याला म्रुत्युही आहे ! हें शाश्वत सत्य स्वीकारून प्रा अविनाश डोळस सर यांना प्रथम स्म्रुतीदिनानिमित्ताने समस्त समाजातर्फे अभिवादन करून त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया ! जय भीम ! जय प्रबुद्ध भारत ! आनंद दिवाकर चक्रनारायण , जिल्हा प्रतिनिधी , दैनिक व्रुत्तरत्न सम्राट , औरंगाबाद ! मो 9422713727

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: