मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन च्या अंतर्गत एका गुन्ह्यामध्ये आरोपी सौरव वाहुरवाघ याने एका अल्पवयीन पिडीत मुलीचे अपहरण करुन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिचे शोषण केले त्यामधून ती अल्पवयीन पिडीत मुलगी गर्भवती राहिली. अशा पीडितेच्या बयानावरून आरोपी सौरव वाहुरवाघ याच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे भा.दं.वि. चे कलम ३६३, ३७६, ३७६(२)(n), व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ४, ६, १६ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली.
आरोपी तर्फे जामिन मिळणे करिता अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीचे वकील ॲड. सचिन वानखडे यांनी आरोपीचे वतीने युक्तीवादा दरम्यान न्यायालयात सांगितले की सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा कोणताही सहभाग नसून त्याला ह्या गुन्ह्यांत खोटे फसविले गेले आहे. तसेच गुन्ह्याचे स्वरूप पाहता भारतीय दंड विधान चे कलम 3७६ तसेच पोक्सो कायद्या मधील तरतुदी आरोपी विरुद्ध लागू होणार नाहीत. तसेच आरोपी हा केवळ २२ वर्षाचा असुन त्याला उज्वल भविष्य आहे व त्याला जर यापुढे सुद्धा जेलमध्ये ठेवण्यात आले तर ईतर जेलमधील अट्टल गुन्हेगारांच्या संगतीने आरोपीचे देखील गुन्हेगारांत रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्याचप्रमाणे आरोपीचे वकील यांनी आरोपीच्या जमानतीवर सुटके करिता काही उच्च न्यायालयाच्या न्यायनीर्णयांकडे सुद्धा न्यायालयाचे लक्ष वेधले व परत न्यायालयास विनंती केली की परिणामतः आरोपीस सदर गुन्ह्याकामी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित तपासाकरिता सदर आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही खटला चालून निकाल होण्यास बराच कालावधी लागणार आहे त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली.
याउलट सरकारी पक्षातर्फे न्यायालयास सांगण्यात आले की आरोपी विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून आरोपी याने पीडितेचे वारंवार शोषण केले आहे व त्याला जर जामीन मिळाला तर त्याचे कडून साक्षीदार यांच्यावर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याने सदरचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती सरकारी पक्षातर्फे न्यायालयास करण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे ॲड. सचिन वानखडे, ॲड. कुंदन वानखडे, ॲड. श्रीकृष्ण तायडे यांनी कामकाज पाहिले.