मूर्तिजापूर शहरात गेल्या दोन तीन महिन्यापासून रस्त्याच्या भूमीपूजनाचा सपाटा सुरू असून त्याच मार्केटिंग मोठा प्रमाणात सुरू आहे. काही स्वतःला जनसेवक समजणारे नकली स्माईल देऊन असे फोटो काढतात जसा निधीचा पैसा खिशातून करत आहे आणि शहरवासीयांवर उपकार केले असे भासवतात.
शहरातील विकासाच्या कामासाठी 100 कोटी आणल्याचा दावा काही ठेकेदार, नगरसेवक करतात त्यातील आतापर्यंत 10 ते 15 कोटींचे काम फक्त शहरातील रस्त्यावर झाले असेल असा अंदाज आहे. यामध्ये असे रस्ते आहेत ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नसतांना कामे सुरू आहेत. नागरिकांच्या दिवसाढवळ्या डोळ्यात धूळ झोकून आणि मुख्य समस्यांकडे डोळेझाक करून भाऊच्या कामाची प्रशंसा सोबतचे 90 वाले कार्यकर्ते करीत आहे.
यामध्ये काही आजी,माजी नगरसेवक व नव्याने तयार झालेले कार्यकर्ते आहेत जे ठेकेदार बनले आहेत, तेही मस्त चांगलेच हात धुवून घेत असल्याचे समजते. एकीकडे शहरातील मुख्यरस्त्याची पूर्ण वाट लावली तर गल्ली बोळातील रस्ते जे अगोदर नगरपालिकेच्या नकाशात नव्हते, सोबतच जिकडे भाऊने किंवा भाऊच्या जवळच्या मित्रांचे प्लॉट असतील तिकडे नवीन रस्त्यांची तर काही वार्डात चांगल्या रस्त्यावर पुन्हा नवीन रस्ते करणे सुरू आहेत. ठेकेदारही कोण आहेत?
जवळचा कार्यकर्ता जो संध्याकाळी बैठकीत सर्व सोयींवर लक्ष देणारा, सोबतच काही आजी, माजी नगरसेवक जे हुकुमावर काम करणारे, बर यांच्याकडे ठेकेदारी काम करण्याचे कोणतेही लायसन्स नसून बिल काढण्यासाठीच फक्त लीगल ठेकेदाराचा वापर करतात. भाऊच या ठेकेदारांवर १०% प्रेम आहे, मग एवढं प्रेम असल्यावर अधिकाऱ्याची काय चालणार आणि जनता तर आधीच झोपेचं सोंग घेऊन झोपलेली आहे. भाऊने काही वर्षातच अफाट माया जमविली तरी हाव मात्र जात नाही.
शहरातील रस्ते ही नागरिकांची गरज आहे का?, गेल्या पाच वर्षात शहरातील रस्त्यासाठी किती निधी आणला आणि खर्च केला, धक्कादायक माहिती समोर येईल. मात्र गेल्या तीस वर्षांपासून पाण्याने व्याकुळ झालेला मूर्तिजापूरकर मस्त मुंग गिळून गप्प आहे. त्यांना पाण्याविषयी काहीच वाटत नाही, त्यासाठी कधी बोलणार सुद्धा नाही. तर काहींच्या मते शहरात जर नियमित पाणी पुरवठा झाला तर टँकरने शहरातील पाणी पोहचविणारे तसेच थंड पाण्याच्या कॅनचा पुरवठा करणारे 50 प्लान्ट वाल्यावर उपासमारीची पाळी येईल म्हणून भाऊ शहरात पाण्याच्या बाबतीत मनावर घेत नाही.
2017 च्या दरम्यान घुंगशी बरेज वरून शहराला तात्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी 6 कोटींची योजना आणली होती, मात्र त्या योजनेचा पाईप सुद्धा शिल्लक नाही. गेल्या 15 वर्षांपासून तालुक्यातील तीन बॅरेजेस काम सुरू आहे मात्र आजही पूर्ण झाले नाही. एकाचे पूर्ण झाले मात्र शेतीला त्याचा काहीच फायदा नाही, जर झाले असते तर शहरातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असता. मूर्तिजापूर शहर हे राज्यातील पहिले शहर असेल ज्याचा आजूबाजूला पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असून सुद्धा नागिरकांना 10 ते 30 दिवस पाणी पुरवठा होत नाही.