मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात भावी आमदारांची पैसे खर्च करण्याची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. कोण किती खर्च करू शकतो? याच मोजमापही मतदार आपापल्यापरीने लावत आहे. लोकही मग वाहत्या प्रवाहात चांगलेच हात धुवून घेत आहे. गावातील सर्व विकास कामे भावी आमदारांकडून निवडणुकीआधीच करून घेण्याचा चंग काही लालची मतदारांनी बांधला आहे. काही बहाद्दर तर “भाऊ, माया माग गावातील 50 पोट्यांची गॅंग आहे त्यांचा खर्चपाणी मलाच करा लागते” यासाठी पैसे मागतात, नाही दिले तर त्या भावी आमदाराची बदनामी करतात. मग अगोदर कामाचा असलेला भावी आमदार त्यांना बिनकामाचा वाटू लागतो. मग अश्या लोकांना ‘त्या’ प्रतिनिधीची आठवण येते, ज्यांनी तुमच्या गावातून मतदान मिळालं नाही म्हणून घरातून हाकलून दिले होत. मग तडजोड करून यापुढं त्या प्रतिनिधीचे गोडवे गाणे सुरू करतात, अश्या दुतोंडी लोकांमुळे मतदारसंघाची अशी दुरावस्था आहे.
निवडून आलेल्या प्रतिनिधींना, लोकहिताचे काम करायचं नाही, कोणीही प्रश्न विचारायचे नाही, जर प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्याचा द्वेष सुरु होतो मग त्याने कोणतेही काम केले की, त्याच्या कामात अडथळा आणण्याचे काम सुरु होते. आतापर्यंत हेच या मतदार संघात सुरु आहे पण कोणाची बोलायची, प्रश्न करण्याची हिम्मत कोणत्याच कार्यकर्त्यामध्ये नाही. एवढंच काय तर यासाठी दोन चार उपाशी पत्रकारही यामध्ये सामील आहेत. चांगल काम केल तर नक्कीच प्रतिनिधीच कौतुक करायला पाहिजे. कोण वाईट, कोण चांगला हे जनतेला समजते, हा नाही तर दुसरा कोण? शेवटी धर्म,जात आडवी आली की जाऊ दे आपलाच होय म्हणून सहन करणे सुरु आहे पण किती दिवस?…
मतदार संघात काही प्रसिद्धी पिसाट, आभासी भावी आमदारांनी सोशल मीडियावर जयजयकार करणाऱ्या फालतू पोस्ट आणि फोटो टाकून लोकांच्या नाकात दम आणलाय, त्यांनी टाकलेल्या पोस्टकडे लोकही दुर्लक्ष करतात कारण लोकांना कळून चुकलय, अनेक जण सांगतात या वेळेस जर पक्षाचं तिकीट मिळालं तर 1000 मतेही मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. अशी लोकामध्ये चर्चा आहे. तर असे भावी आमदार कोणाचाही कार्यक्रम असो की आपल्या आवडत्या सल्लागारासह तिथं हजर असतात आणि पुढे पुढे करून प्रसिद्ध मिळवायचा प्रयत्न करतात. असे प्रसिद्ध पिसाट लोक तुमचं प्रतिनिधी करतील?…भावी आमदारांच्या लिस्ट मध्ये रक्त्याचे पाणी करणारे एक दोन चांगले उमेदवार आहेत त्यांना लुटण्याचे काम सध्यातरी करू नका, जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर. मतदार संघात आणखी बर्याच उमेदवारांची एन्ट्री बाकी असल्याने सध्या स्थितीत कोण किती चांगला आहे सांगणे अवघड आहे. तुम्ही त्यांचा पैसा पाहून जर चांगले म्हणत असाल तर अशी घोड चूक करू नका. ज्याचा उद्देश चांगला असेल त्यालाच जवळ करा…
तुमचा प्रतिनिधी कसा असला पाहिजे?
खरं तर प्रतिनिधी हा अडीच तालुक्यातील जनतेचा मायबाप असतो त्याला सर्वच धर्माचे लोक सारखे असले पाहिजे मग कोणत्याही जातीचा असो, नेहमी सर्व जनतेच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्या प्रतिनिधीची खरी गरज आहे. येणाऱ्या आपल्या मतदार संघात चांगला प्रतिनिधी निवडून देणं आपलं कर्तव्य आहे. कोणता भावी आमदार किती पैसेवाला हे पाहून जर जवळ करत असाल तर तुमच्यावर केलेला खर्च काढणार कुठून हे लक्षात ठेवा. ‘महाव्हाईस न्यूज’ काही निवडक चांगल्या उमेदवारांची कहाणी तुमच्यापर्यंत पोहचवणार, त्यांच्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्या भावी आमदारांची कुंडली तुमच्यापर्यंत पोहचणे आमचे काम आहे.