मूर्तिजापूर : ब्रिटीश राजवटीत बांधलेली शकुंतला रेल्वे सध्या बंद स्थितीत आहे, तिला ब्रॉडगेज बनविण्यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा होत आहेत परंतु त्याकडे कोणताही राजकारणी पुढाकार घेत नाही. मात्र आज मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत शकुंतला ब्रॉडगेज बाबत मुद्दा उचलून धरत यावेळी त्यांनी आपल्याच सरकारला प्रश्न विचारले आहेत. तर हरीश पिंपळे यांच्या मदतीला अचलपूरचे आमदार बच्चू कडू आले असता त्यांनीही शकुंतलाचा मुद्दा गांभीर्याने मांडला आहे.
हरीश पिंपळे विधानसभेत म्हणाले, विदर्भाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीकोनातून दळणवळणची काम करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मुख्यमंत्री स्तरावर आपण बैठक घेऊन आपण तातडीने ब्रॉडगेज तयार करण्यासाठी डीपीआर तयार करून 50 टक्के निधी राज्य सरकार देणार अशी हमी मंत्री महोदय देणार आहेत का? आणि हे मीटिंग किती दिवसात आपण लावणार आहोत असाही सवाल यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी केला.
मूर्तिजापूर यवतमाळ आणि अचलपूर या दरम्यानची 190 किमी लांबीची नॅरोगेज रेल्वे लाइन आहे. या ट्रॅकवरील गाड्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (जीआयपीआर) द्वारे चालवल्या जात होत्या, जी मध्य भारतात चालत होती. आश्चर्य म्हणजे 1952 मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा या मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते. ट्रॅक आजही एकोणिसाव्या शतकात बसवणाऱ्या फर्मच्या मालकीचे आहेत.