मूर्तिजापूर : प्राप्त माहितीनुसार हकिकत अशाप्रकारे आहे की दिनांक ८/५/२०२४ रोजी मूर्तिजापूर येथील रहिवाशी श्री राजेश गुप्ता हे त्यांच्या वाईन शॉप मधून १,४५०००/- (एक लाख पंचेचाळीस हजार रुपये) घेऊन रात्री ०१ वाजता चे दरम्यान घरी जाण्याकरिता निघाले असता मूर्तिजापूर हायस्कूलच्या समोर काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला व त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम रुपये १,४५०००/- जबरदस्तीने हिसकावून घेतली त्यानंतर त्यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला.
सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य तपास करून गुन्ह्यातील एक आरोपी मंथन वाकोडे यास अटक केली होती.
त्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे जामीन मिळण्याकरिता अर्ज केला. आरोपीच्या वतीने युक्तीवादा दरम्यान न्यायालयास सांगण्यात आले की आरोपी हा सदर गुन्ह्यात सामील नव्हता व त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही व त्याला या गुन्ह्यामध्ये खोटे फसविण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आरोपी हा तरुण असून त्याला जेलमध्ये ठेवल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्याचप्रमाणे आरोपीस जमानत मिळण्याकरिता इतरही काही महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
सरकार पक्षाचा व आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने न्यायालयामध्ये ॲड. सचिन वानखडे व ॲड. श्रीकृष्ण तायडे यांनी युक्तिवाद केला.