Monday, December 23, 2024
Homeराज्यनळ कधी येणार?…या शापातून मूर्तिजापूरकरांची कधी सुटका होणार?…

नळ कधी येणार?…या शापातून मूर्तिजापूरकरांची कधी सुटका होणार?…

माजी नगर सेवक सांगतात समाज माध्यमातून ‘कधी येणार नळ’…आम्हीच जनतेचे पायीक असल्याचा आणतात आव…

मूर्तिजापूरकरांनो आठवते, एकेकाळी शहरात दररोज पाण्याचा पुरवठा व्हायचा, त्याला जवळपास २५ वर्ष होऊन गेलीत, तेव्हापासून पाच वेळा नगरपालिकेची सत्ता बदलली, अनेक नवीन चेहऱ्यांना संधीही मिळाली तर बरेच जुने चेहरे सुद्धा आहेत, मात्र गेल्या २५ वर्षात मूर्तिजापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा कधीच झाला नाही, काय कारण असेल?, तुमच्या नगरसेवकांनी तुम्हाला पाणी मिळाव यासाठी कधी पाठपुरावा केला का?, बरं केलाही असेल तर निकाल काय? केवळ आज एखाद्या ‘प्रभागात नळ येणार’ एवढाच मेसेज समाज माध्यमावर टाकण्यापूरतेच माजी नगर सेवकांचे काम आहे का..? हे जनतेने ध्यानी घेणे गरजेचे आहे. आणखी किती दिवस पाणी मिळणार नाही?…शहरात १०० कोटींच्या निधीची घोषणा केली जाते, त्यातील पाण्यासाठी किती, असा यक्ष प्रश्न जनते समोर उभा ठाकला आहे. असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. पण बाहेर येणार नाहीत, कारणही तसंच आहे ते म्हणजे “संबध” हेच आडवे येतात…

शहराला साधारण दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे, मात्र कधी कधी यासाठी १५ ते २० दिवसही लागतात तर यासाठी जबाबदार असलेलं नगरपालिका प्रशासन, त्याच नियोजन शून्य कारभारामुळे नागरीकांना नाहक त्रास होतो. म्हणूनच आपली समस्या मांडण्यासाठी आपण आपला प्रतिनिधी निवडतो. मात्र प्रतिनिधी कमिशन आणि ठेके घेण्यात मग्न असतो. तेवढ बर काही माजी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या दत्तक ठेकेदारांची मक्तेदारीही मोडून काढली.

काही उत्साही माजी नगरसेवकाला तुम्ही विचारलं नळ कधी येणार? तर तुम्हाला एवढं चांगलं पटवून सांगणार आणि तुमचाही त्यावर विश्वास बसणार. एक नगरसेवकाने तर कमालच केली म्हणाला, आम्ही दररोज पाणीपुरवठा करू शकतो पण दररोज पाणी पुरवठा केला तर नागरिकांना पाण्याची किंमत कळणार नाही, नागरिक पाण्याची नासाडी करतील आता येणाऱ्या वर्षात मोठी जल योजनाही शहरासाठी येणार असल्याच्या थापाही देतात. मात्र त्यांचा पाच वर्षांचा कालावधी निघून गेला तरी मूर्तिजापूकरांचे घसा कोरडाच.

दुसरीकडे शहरात रस्तावर-रस्ते बांधकाम करण्याचा धडाका दोन चार माजी नगरसेवकांनी सुरू केला आणि स्वतःच ठेकेदारही बनले, बरं अधिकारी यावर चक्क डोळे मिटून त्यांचे बिलेही पास करताना. भाऊला द्या लागतात म्हणून भाऊंची बदनामीही करतात मात्र काही नगरसेवक याला अपवाद आहेत, या कमिशन खोरीच्या भांडगडीत न पडता शहरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या घेऊन ते शासन दरबारी भांडतात एवढंच काय तर ज्या वॉर्डात समस्या असेल ते सार्वजनिक सोशल मीडियावर ही मांडतात पण अधिकारी वर्ग अश्या नगरसेवकांना गांभीर्याने घेत नाही, याचं दररोज काम आहे म्हणून दुर्लक्ष करतात. मग तो कितीही गंभीर मुद्दा असला तरी…

१४ वर्षांपूर्वी पाण्यासाठी साईराज मित्र मंडळाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाला गालबोट लागल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी संपूर्ण शहर रस्त्यावर आले होते. त्यानंतर एक योजनाही आली होती पण तेही अजून सुरळीत झाली नाही. त्यानंतर कधीच शहरात पाण्यासाठी मोठं आंदोलन झालं नाही आणि होणार नाही कारण इथल्या नागरीकांना पाण्याविणाच जगण्याची सवय जडली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: