मूर्तिजापूर – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातून तब्बल ८४ विद्यार्थी पात्र झाल्याने शैक्षणिक वर्षांत या तालुक्यात इतिहास रचल्या गेला.
शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.सुचिता पाटेकर यांचे प्रेरणेने तालुक्याचे तात्कालीन गटशिक्षणाधिकारी सन्माननीय संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विज्ञान अध्यापक मंडळाची सभा घेऊन तालुक्यातून सर्वप्रथम जास्तीत जास्त ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठीच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या त्यानुसार शहरी आणि ग्रामीण असे एकूण २३० शाळांपैकी पात्र ५५ शाळांनी १०० टक्के आपले प्रतिभावान ५८२ विद्यार्थी परीक्षेला बसविले.
यासाठी सर्व पात्र शाळांचे मुख्याध्यापक आणि विज्ञान शिक्षकांनी मदत केली. अकोला जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी संख्या २१२ असून एकट्या मूर्तिजापूर तालुक्यातून प्रथम ८४ विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत.पात्रतेची टक्केवारी ४० टक्के आहे.सन २०२१-२२ ला तालुक्यातून केवळ ३ विद्यार्थी पात्र होते तर परीक्षेला बसलेले १३८ विद्यार्थी होते.सदर शिष्यवृत्तीचा लाभ म्हणून पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार प्रमाणे पुढील चार वर्ष असे एकूण ४८ हजार मिळणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मोठा फायदा होऊन येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा मिळणार आहे.
यासाठी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.रवींद्र भास्कर यांची शिष्यवृत्ती परीक्षा संबंधित असलेली आर एस पी कार्यशाळा राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर रविवारी यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असते ज्यामध्ये राज्यातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर रविवारी युट्युब लिंक च्या माध्यमातून मिळते. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.सुचिता पाटेकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी मूर्तिजापूर रेखा राऊत, तसेच विस्तार अधिकारी संजय मोरे, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.