मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हातगावच्या ग्रामसेवकाने कंत्राटदाराशी संगनमत करून दलित वस्ती निधीतील तब्बल सव्वा दोन लाखांवर डल्ला मारल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीवरून दिसून आले आहे. या संदर्भात संबंधितांकडून चौकशी पूर्ण झाली असली तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकारी दोषी तत्कालीन ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याकरिता प्रयत्नशील असल्याचा आरोप यासंदर्भातील तक्रारकर्त्याने केला आहे.
अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हातगाव अंतर्गत अनेक काळे बेरे धंदे होत असल्याची कुजबूज होती. त्यावरून माजी सैनिक सुरेश जोगळे यांनी ग्रामपंचायत मधील गैरकृत्यांच्या तक्रारी केल्या. सोबतच अनेक कामांबाबत माहिती अधिकारांन्वये माहिती मागितली. परंतु माहिती संदर्भात ग्रामपंचायत तत्कालीन सचिव यांनी जोगळेंच्या ताकास तूर लागू दिला नाही. परंतु जोगळेंनी सातत्याने केलेल्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी मुर्तीजापुर यांनी ग्रामपंचायत हातगावची चौकशी लावली. त्याकरिता यु. एन. निखाडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर, बी. डी. झटाले कनिष्ठ अभियंता पंचायत समिती मुर्तीजापुर, विजय कीर्तने विस्तार अधिकारी पंचायत समिती मुर्तीजापुर यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले.
हे चौकशी पथक दिनांक २८.९.२०२२ रोजी ग्रामपंचायत हातगाव येथे डेरे दाखल झाले. सुरेश जोगळे यांचे तक्रारीतील मुद्देनिहाय चौकशी या पथकाने केली. ग्रामपंचायत हातगाव अंतर्गत स्मशानभूमीचे बांधकामाबाबत चौकशी पथकाने म्हटले आहे कि, या कामाचा कार्यारंभ आदेश दिल्यावरही ते काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. हातगाव ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातील ७,१८,२१६ रुपये खर्चाबाबतची माहिती सचिवाने दडवून ठेवल्याप्रकरणी चौकशी पथकाने म्हटले कि, तत्कालीन सचिव यांनी या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही. सचिवाने दलित वस्ती निधीतून २,२५,००० रुपये कंत्राटदाराला दिले. मात्र त्याचा कोणताही तपशील रेकॉर्डमध्ये नाही. त्यामुळे चौकशीकरिता रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही, अशी नोंद चौकशी पथकाने घेतली. यासोबतच गुणवंत नगर बायपास स्टेट बँक हातगाव ते पंजाबराव भेंडे यांचे घरापर्यंतचे खडीकरण व पावसाचे पाण्याची विल्हेवाट लावणे ह्या कामांचेही रेकॉर्ड सचिवाने चौकशी पथकापासून दडवून ठेवले. परिणामी ही चौकशी फुस्स…झाली.
परंतु तक्रारदार सुरेश जोगळे यांनी हार न मानता या प्रकरणांचा पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखापाल मुर्तीजापुर यांचे करवी ग्रामपंचायत हातगावची पुन्हा चौकशी लावली गेली. या पथकाने दिनांक ३.२.२०२३ रोजी ग्रामपंचायत हातगावला भेट दिली. यावेळी मात्र शिकाऱ्यांचे हातून सावज निसटू शकले नाही. या पथकाने दलित वस्ती रोख पुस्तकाची पडताळणी केली. त्यावेळी सचिवाने अन्वर बिल्डर या कंत्राटदारास या निधीतून २,२५,००० रुपये अदा केल्याचे आढळून आले. ही रक्कम धनादेश क्रमांक ०८२४०४ नुसार देण्यात आली. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मुर्तीजापुर येथे ग्रामपंचायत हातगाव चे खाते क्रमांक ०६१९१०२०१०००९०५ ची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये कंत्राटदाराने ही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले.