अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. तर भावी उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना आपणच तुमचे लाडके उमेदवार असल्याचं भासवत आहे. सोबत शहरातील चौकात अनधिकृत पोस्टर लावून आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळणार असल्याचे संभ्रम निर्माण करीत आहे. मात्र गेल्या पाच वर्षा अगोदर यातील काही चेहरे एकदाही मतदारसंघात फिरकल्याचे दिसले नाही तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरच मतदारसंघात प्रकट झाले आहे. तर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रलोभने, आमिष दाखवून त्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन आपलं नाव करण्याचा प्रयत्न करीत आहे.
यातील काही भावी उमेदवार गेल्या तीन-चार महिन्यापासून मतदार संघात सक्रिय झाले तर काही उमेदवार गेल्या एक वर्षापासून, मात्र गेल्या पंधरा वर्षापासून मतदार संघात जे मेहनत करीत आहे ते मात्र शांत आहेत. मागील पाच वर्षात मतदार संघात अनेक समस्यांना नागरिक तोंड देत होते, तेव्हा मात्र नागरिकांना दिलासा देण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी यातील एकही भावी उमेदवार बिळातून बाहेर आले नाहीत. मात्र आता विधानसभेचे औचित्य साधून भावी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. तर काही भावी उमेदवारांनी मतदारसंघातील नागरिकांना पैशाचे प्रलोभन देऊन त्यांना पैशाची लत लावून दिली त्यामुळे कोणताही उमेदवार आला तर तो फक्त किती पैसे खर्च करतो यावरच त्यांचे लक्ष आहे.
या मतदारसंघात अनेक समस्या आहेत मतदारसंघातील अनेक गावांना रस्ते व्यवस्थित नाहीत तर काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते अशातच खोटा दिलासा देण्याचे काही भावी उमेदवार प्रयत्न करत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून विकासापासून वंचित असलेला विधानसभा मतदारसंघ असून सर्वाधित भावी विधानसभा उमेदवारांचा भरणा याच मतदार संघात आहे. कमिशन खोरीमुळे या मतदारसंघाचा किती विकास झाला हे सर्व जनतेला चांगलं ठाऊक आहे. मूर्तिजापूर शहरातील जागतिक कीर्तीचा जो मुख्य रस्ता बनविला गेला तो पाहता क्षणी आपला विकास किती मजबूत झाल्याचे दर्शन होते. कदाचित तो पाहूनच अनेकांचं मन या मतदारसंघासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आतुर झाले असावे. कारण येथील मतदार जर जागरूक असता तर त्यांनी अश्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला असता. खरतर येथील मतदार झोपलेला पाहूनच येथील मतदार संघात भावी उमेदवारांची गर्दी होत आहे. सोबतच भाऊने कष्टाने उभी केलेली संपत्तीही या मतदार संघाच्या आकर्षणाचे कारण असू शकते. येथील मतदारांना विकासाच काही घेणदेण नसल्याचे पाहूनच भाऊने आपले घर भरणे सुरु केले. सोबतच दोनचार गरीब ठेकेदारांना ही मोठ केले.