मूर्तिजापूर : संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूर्तिजापूर शहराची पाण्याविना काय अवस्था झाली? गाडगेबाबांचा तहानलेल्या पाणी देणारा संदेश लोकप्रतिनिधी विसरले की, काय असा यक्ष प्रश्न मूर्तिजापूरकरांसमोर उभा ठाकला आहे, गेल्या 22 वर्षांपासून पाण्याचा दुष्काळ या शहरात पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी भाषणात गाडगेबाबा यांचं नाव घेतात. अजूनही शहरातील पाणी प्रश्न सोडवू नशकल्याने गाडगे बाबाच्या दशसूत्रीचा विसर पडला असल्याचे जाणवते. शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आला परंतु शहरात पाण्याचा थेंबही पोहोचला नसल्याने मूर्तिजापूरकरांच्या घशाला कोरड पडली आहे. याला जबाबदार आपणच म्हणावं लागेल, कारण हा आपला तो आपला करण्यात आपले एवढे वर्ष निघून गेले…
जीवन प्राधिकरणाने सन २०१० मध्ये २६ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली तरी मात्र अजूनही त्याच पद्धतीने पाणी पुरवठा असल्याचे दिसून येते. ही योजना पूर्ण करण्यासाठी 11 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. कामाचा दर्जापाहूनच तुम्हाला कमिशनखोरीचा अंदाज येईल. कोणी हिशोब मागणारा नाही आणि कोणी देणारा दिसत नाही. आतापर्यंत किती खर्च झाला हेही माहिती मिळत नाही. तर 2017-18 या दरम्यान घुंगशी बरेज वरून शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून 7 कोटींची तात्काळ पाणी पुरवठा योजना आणली होती, त्या योजनेचे नेमक काय झाल? हेही समजत नाही ज्या रस्त्याने ती पाणी पुरवठा योजना राबविल्या गेली त्या ठिकाणी आता पाईप सुद्धा शिल्लक नाही. या योजनेचे 1 कोटी शिल्लक उरले होते ते तत्कालीन मुख्याधिकारी लोहकरे यांनी परत केले होते.
पाणी वाटपाचे झोन पद्धतीने शहराचे वाटोळे केले आहे. व्यक्ती पाहून नळाची धार ठरविल्या जाते, जे आधी जनप्रतिनिधी होते त्यांच्या घरी वेगळी जोडणी आणि सामान्यांना वेगळी जोडणी अस का? शहर हे दोन विभागात असल्याने प्रथम स्टेशन विभाग व त्यानंतर जुनी वस्तीमध्ये प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जातो. सध्या शहराला दर दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. एवढच काय तर गेल्या 6 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टाकीच स्वच्छ केली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची अनेकदा काही नगरसेवकांनी केली. मात्र कोणालाही कोणाचे देणघेण नाही. आता निवडणुकीची चाहूल लागताच अनेक भावी नगराध्यक्ष कामाला लागले आहे. आपपल्या परीने एकदोन पत्रकार जवळ ठेवून भाऊच्या कामाचे गोडवे गाणाऱ्या बातम्या काही दिवसात वाचायला मिळतील.