आकोट- संजय आठवले
मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ मध्ये अवैध उत्खनन करून केलेला खड्डा तेथीलच गट क्रमांक ९८ मध्ये पुन्हा अवैध उत्खनन करून त्या गौण खनिजाद्वारे बूजविल्या जात असताना मूर्तिजापूर महसूल विभागाने कारवाई करून एक वाहन जप्त केले आहे. सोबतच या दुसऱ्या उत्खननाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यांचे आदेशानंतर या दुसऱ्या उत्खननाचे मोजमाप आणि त्यावर दंड आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती मूर्तिजापूर महसूल विभागाने दिली आहे.
येथे उल्लेखनीय आहे की, मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ मध्ये जमीन धारक दीपक अव्वलवार यांनी तब्बल १२ हजार ११५.५९ ब्रास उत्खनन केले. त्यापोटी त्यांना १८ कोटी ९० लक्ष ९ हजार ६०० रूपये दंड ठोठावण्यात आला.
ह्या दंड वसुली करता त्यांना मूर्तिजापूर महसूल विभागाने तीन नोटीसेही पाठवल्या आहेत. मात्र त्याची कोणतीच दखल न घेता अव्वलवार यांनी मुर्तीजापुर येथील “भाऊ” यांचा सल्ला घेतला. त्या सल्ल्यानुसार दंडाचा भरणा करण्याऐवजी उत्खननाने निर्माण झालेला खड्डा भरण्याचे अवैधानिक काम त्यांनी सुरू केले. या गट क्रमांक ९६ मधील खड्डा बुजवून टाकण्याकरिता त्यांनी त्यांचेच मालकीच्या गट क्रमांक ९८ मध्ये पुन्हा अवैध उत्खनन केले. त्यातून निघालेले गौण खनिज त्यांनी आधीच्या खड्ड्यात टाकले. हे गौणखनिज टाकल्याचे पुरावे नष्ट करण्याकरिता त्यावर तुषार सिंचनाद्वारे पाणी फिरवून त्याची व्यवस्थित दबाईही केली. हा सारा खटाटोप अवैध उत्खननाचे क्षेत्र कमी दिसावे व त्यायोगे दंड आकारणी कमी व्हावी याकरिता करण्यात आला आहे.
हा सारा सावळा गोंधळ महाव्हाईसने चव्हाट्यावर आणला. त्याने मूर्तिजापूर महसूल विभाग खडबडून जागा झाला. आणि त्यांनी अवलवार यांचे गट क्रमांक ९८ मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कामावर कारवाई केली. या कारवाईत गौण खनिज वाहून नेणारे एक वाहन जप्त करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत या ठिकाणी चार ते पाच हजार ब्रास अवैध उत्खनन करून वाहून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या साऱ्या कारवाईचा अहवाल अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पुढील आदेशानंतर या ठिकाणाचे मूर्तिजापूर भूमी अभिलेख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ज्ञांकडून मोजमाप घेण्यात येणार आहे. त्यानंतर निश्चित झालेल्या गौण खनिजावर नियमानुसार दंड आकारणी करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार प्रदीप पवार आणि नायब तहसीलदार बनसोडे यांनी दिली.
ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी केवळ एकच वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यावरून ह्या ठिकाणी वाहने जप्तीबाबत महसूल विभागाकडून गल्लत झाल्याचे दिसून येते. याचे कारण असे की, प्रत्यक्षदर्शीचे सांगण्यानुसार व येथे केलेल्या चित्रीकरणानुसार ह्या ठिकाणी वाहनासोबतच उत्खनन करणारा जेसीबीही असल्याचे दिसत आहे. परंतु हा जेसीबी जप्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे महसूल विभागाने ह्या ठिकाणी काटेकोर कारवाई केली नसल्याचे स्पष्ट होते. दुसरे असे की, गट क्रमांक ९६ मधील खड्ड्यात गौण खनिज भरल्यानंतर त्यावर तुषार सिंचनाद्वारे पाणी मारण्यात आले आहे. याकरिता विद्युतची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी विद्युत मीटर कार्यरत असल्याचे स्पष्ट होते. ह्या मीटर मधून घेतलेल्या विजेद्वारे तुषार सिंचन करून येथील पुरावे नष्ट करण्यात येत असल्याने हे विद्युत मीटर तथा तुषार सिंचनाचे साहित्यही जप्त करावयास हवे होते. मात्र तसे झालेले नाही.
परंतु अर्धवट का होईना ही कारवाई झाल्याने अव्वलवार या ठिकाणी गैरकृत्य करीत असल्याचे सिद्ध होऊन या संदर्भात महाव्हाईसने केलेल्या वस्तुनिष्ठ वृत्तांकनाला महसूल विभागाचा दुजोरा मिळाला आहे. सोबतच आपला पहिला अपराध दडविण्याकरिता दुसरा अपराध करण्याचा मुर्तीजापुर येथील “भाऊं” नी दिलेला सल्ला अव्वलवार यांच्या अंगलट येणार हे महाव्हाईसचे भाकीतही खरे ठरले आहे. आता गट क्रमांक ९८ मध्ये पुन्हा केलेल्या अवैध उत्खननाबाबत काय कारवाई होते याकडे लक्ष लागलेले आहे.