मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम शेरवाडी येथे सन २०१४ मध्ये फिर्यादी अरुण किसन गावंडे त्यांचे मुली सोबत, मुलासोबत व ट्रॅक्टर चालका सोबत शेतीचे काम करण्याकरिता शेतामध्ये गेले होते. सदर घटनेच्या ठिकाणी शेतीच्या वादावरून तेथे मनोज गणेशराव ढाकरे व संजय बढे हे तेथे आले. त्यावेळेस मनोज गणेश ठाकरे यांच्या हातात कुऱ्हाड होती व शेतामध्ये ट्रॅक्टर चालविण्यास मनाई करून आरोपींनी फिर्यादी अरुण गावंडे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला व त्यांना जखमी केले तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली अशा फिर्यादी यांच्या जबानी रिपोर्ट व वैद्यकीय अहवाल वरून आरोपीं विरुद्ध भारतीय दंड विधान चे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर सदरचा खटला हा मुर्तीजापुर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.
सरकारी पक्षातर्फे सदर प्रकरणामध्ये एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की, आरोपीने जाणून-बुजून फिर्यादी यांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून त्यांना जखमी केले तसेच आरोपींविरोधात सबळ पुरावा मिळून आला असून त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात यावी.
त्यानंतर आरोपींच्या वतीने अॅड. सचिन वानखडे यांनी आरोपींची बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की गुन्हा घडण्याचे ठिकाण हे आरोपींचे स्वतःचे शेत असून फिर्यादीने केवळ आरोपींकडून शेत मिळावे म्हणून त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे सरकारी पक्षाचा पुरावा हा विश्वसनीय नसून तो विश्वासार्ह ठरणार नाही असे देखील न्यायालयात सांगितले त्याचप्रमाणे साक्षीदारांच्या पुराव्यामध्ये विसंगती असून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही व त्याद्वारे आरोपीस शिक्षा देणे कायद्यानुसार योग्य ठरणार नाही हे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच आरोपींच्या बचावा करिता इतर काही महत्त्वाच्या बाबींकडे सुद्धा न्यायालयाचे लक्ष युक्तिवादा दरम्यान वेधले व सदर गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयाने सरकारी पक्ष व आरोपींच्या वतीने युक्तिवाद ऐकून सदर गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्या वतीने अॅड. सचिन वानखडे, अॅड. कुंदन वानखडे व अॅड. श्रीकृष्ण तायडे यांनी सदर खटल्याचे काम पाहिले.