सांगली – ज्योती मोरे
मिरज तालुक्यातील बेडगमधील मल्लेवाडी रस्त्यावर असणाऱ्या खरात वस्तीवरील रामचंद्र उर्फ बंडू शंकर खरात वय वर्षे 50 यांचा त्यांच्या सख्ख्या चुलत भावाने सचिन खरात याने कुऱ्हाडीचे घाव घालून रात्री सात ते आठच्या दरम्यान खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान डोक्यावर आणि पाठीमध्ये वर्मी घाव बसल्याने रामचंद्र खरात यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी सचिन खरात हा स्वतःहून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला.
आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी पाठवला. सदरचा खून हा पूर्ववैमन्यस्यातून झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात एका मागोमाग एक खुनाच्या घटना घडल्या आहेत.
रिलायन्स ज्वेलर्स वरील दिवसाढवळ्या दरोडा, अमली पदार्थांची तसंच नसेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री, आणि खुणाचे सत्र हे सर्व पाहता सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनाकडे आशेने पाहत आहेत.