Wednesday, October 9, 2024
Homeराज्यमुंडगाव व उमरावासीयांचा हिवरखेड तालुक्यात जाण्यास नकार…तहसीलदार आकोट यांना दिले निवेदन…

मुंडगाव व उमरावासीयांचा हिवरखेड तालुक्यात जाण्यास नकार…तहसीलदार आकोट यांना दिले निवेदन…

आकोट – संजय आठवले

आकोट व तेल्हारा तालुक्याचे विभाजन करून हिवरखेड या नवीन तालुक्याची निर्मिती करणेकरिता शासनाची तयारी सुरू झाली असून ह्या तालुक्यात समावेश होणे बाबत मुंडगाव आणि उमरा या महसूल मंडळातील ग्रामस्थांचा कल जाणून घेणेकरिता या दोन्ही महसूल मंडळातील ग्रामस्थांकडून शासनाद्वारे आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या हरकती दि. ५.३.२०२४ पर्यंत दाखल करावयाच्या होत्या. त्यानुसार ह्या ग्रामपंचायतींनी हिवरखेड तालुक्यात जाण्यास विरोध प्रदर्शित केला आहे.

यासंदर्भात मुंडगाव ग्रामपंचायत उपसरपंच तुषार पाचपोर यांचे नेतृत्वात सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार आकोट यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात स्पष्ट केले आहे कि, मुंडगाव हे आकोट तालुक्यातील सर्वाधिक मोठे गाव आहे.

हे गाव आकोट पासून लोहारी मार्गे अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर आहे. तर हिवरखेड ते मुंडगाव हे अंतर ३० किलोमीटर आहे. येथील बहुतांश विद्यार्थी आकोट येथील शिक्षण संस्थांमध्येच शिक्षणाकरता रोज येणे जाणे करतात.

त्यासोबतच गावातील अनेक युवक रोजगाराकरिता तर अन्य ग्रामस्थ अन्य व्यवहाराकरिता आकोट बाजारपेठेतच जातात. येथील शेतकऱ्यांचा आकोट येथील व्यापाऱ्यांशीच व्यवहार होत आहे. त्यासोबतच रुग्णसेवा प्राप्त करणे करिता ही येथील रुग्ण आकोट येथेच जातात.

अशा स्थितीत हिवरखेड तालुक्याशी हे गाव जोडले गेल्यास गावकऱ्यांना मोठे जिकरीचे व त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे मुंडगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतचा हिवरखेड तालुक्यात जाण्यास विरोध असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

तर दुसरीकडे आकोट तालुक्यातील महसूल मंडळ असलेल्या उमरा येथील ग्रामपंचायतने ह्या विरोधात ठराव पारित केला आहे. सरपंच सौ. अर्चना श्याम लबडे तथा समस्त सदस्य यांनी ह्या ठरावास दुजोरा दिला आहे.

या ठरावात म्हटले गेले आहे कि, उमरा हे गाव आकोट पासून अवघे ८ किलोमीटर अंतरावर आहे तर हिवरखेड पासून १८ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांकरिता अकोट शहर अतिशय जवळचे व सोयीचे आहे.

त्यासोबतच येथील शेतकरी व अन्य ग्रामस्थांची मुख्य बाजारपेठ आकोटच आहे. शालेय शिक्षण, रुग्णाची चिकित्सा, रोजगार याकरिता आकोट हेच सर्व परीने योग्य ठिकाण आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या हिवरखेड तालुक्यात या गावाचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी उमरावासीयांनी केली आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, हिवरखेड तालुक्यात समाविष्ट होणे बाबत मुंडगाव महसूल मंडळातील २३ तर उमरा महसूल मंडळातील २५ गावांना त्यांचा कल विचारण्यात आला आहे. या गावांचा कल पाहून त्यावर शासन निर्णय होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: