Friday, January 3, 2025
Homeराजकीयमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महत्त्वाकांक्षी प्रकल्प...मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महत्त्वाकांक्षी प्रकल्प…मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन…

अमरावती/मुंबई – सौर ऊर्जा तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्य सरकारचा प्रमुख प्रकल्प म्हणून त्याच्या अंमलबजावणीवर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० या अभियानाचा शुभारंभ मा. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत मुंबईत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करणे आणि २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन २०२५’ या अभियानाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे.

मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सौर ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सूक आहेत. या प्रकल्पांसाठी ज्या वेगाने जमिनी उपलब्ध होतील त्या वेगाने कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविता येतील. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन भाड्याने दिली तर त्यांना दरवर्षी हेक्टरी सव्वा लाख रुपये भाडे मिळेल. जमीन उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आपला जिल्हा सर्वप्रथम शेतीसाठी शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारा होईल व जिल्ह्यात शेतीला दिवसाचे २४ तास वीज उपलब्ध होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दीष्ट ठेवावे.

त्यांनी सांगितले की, सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा वापर केला तर शेतीसाठी कमी दरात वीज उपलब्ध होईल आणि उद्योगांसाठीच्या वीजदरात लागू केलेली क्रॉस सबसिडी कमी करता येईल. राज्यातील उद्योग क्षेत्राला त्यामुळे अधिक स्पर्धात्मक होता येईल.

शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याप्रमाणे आगामी काळात ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, ग्रामपंचायत कार्यालये इत्यादी सौर ऊर्जेवर चालविण्याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी ऊर्जा विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ची धोरणात्मक संकल्पना स्पष्ट करणारे सादरीकरण केले. मा. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी योजनेबद्दल सादरीकरण केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: