मुंबई – गणेश तळेकर
नुकतीच मध्यवर्ती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माननीय सौ नीलम ताई शिर्के_ सामंत यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेला सदिच्छा भेट दिली. शाखेचे सगळे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, सभासद हितचिंतक, बाल प्रेक्षक, बालकलाकार या सर्वांच्या उपस्थितीत ही भेट संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ नीलम ताई शिर्के _सामंत यांचे औक्षण करून स्वागत करण्यांत आले.
नागपूर शाखेची निर्मिती असलेले बालरंगभूमी परिषदेचे गीत मुंबई शाखेच्या बालकलाकारांनी नृत्य स्वरूपांत अतिशय सुंदर रित्या सादर केले. दिग्दर्शन केले होते डॉ. किशुपाल मॅडम यांनी. नयनरम्य नृत्य सादर करणाऱ्या बालकलाकारांनी माननीय अध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर माननीय अध्यक्ष व कार्यवाह यांनी बृहन्मुंबई शाखेच्या स्थापनेपासून आतापर्यंत सादर झालेल्या विविध कार्यक्रमांचा वृत्तांत दृकश्राव्य चित्रफितीद्वारे सादर केला. व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर सौ नीलम ताईंची कार्याध्यक्ष सौ .ज्योती निसळ , कोषाध्यक्षा सौ .माळकर मॅडम यांनी पारंपारिक पद्धतीने ओटी भरली.
शाखेच्या कार्याध्यक्ष सौ ज्योती निसळ यांनी आपल्या मनोगतातून मॅडमचा यथोचित कार्यगौरव केला. नृत्य सादर करणाऱ्या बालकलावंतांचे मॅडमच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. त्यांचे पोट्रेट त्यांना भेट म्हणून देण्यांत आले. तदनंतर’ महोत्सव लोककलेचा’या आगामी कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकाचे सुद्धा अनावरण मॅडमच्या हस्तें करण्यांत आले. संस्थेचे कार्यवाह असेफ अन्सारी यांनी मॅडमनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रभर केलेले दौरे, परिषदेसाठी केलेले प्रबोधन, या संदर्भात माहिती दिली. अध्यक्ष श्री. राजू तुलालवार यांनी रंगभूमी परिषद मुंबई शाखेच्या कार्यक्रमांचे त्याचप्रमाणे आर्थिक ताळेबंदाचे थोडक्यांत विश्लेषण केले व आवश्यक ती मदत मिळाल्यास जास्त काम करण्याची हमीही दिली.
मॅडमनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बालरंगभूमी परिषदेची गरज, उद्दिष्टे, कार्यवाही अंमलबजावणीतील अडचणी त्याचप्रमाणे बालकलाकार बाल- प्रेक्षक ,पालक वर्ग ,शिक्षक या सर्वांच्या सहभागाविषयी असलेल्या अडचणी, समस्या, आजच्या मुलांवर असलेला गॅझेटचा प्रभाव ,अशा अनेक गोष्टींचा उहापोह केला. मुलांच्या शिक्षण आणि कलेबरोबरच त्यांचा व्यक्तिविकासही व्हायला हवा असेही त्यांनी प्रतिपादन केले.आणि त्यावर समाधानकारक उपायही सुचविले. उपस्थितांनीही आपल्या समस्या, सूचना त्यांच्यासमोर विशद केल्यात आणि त्यांनाही मॅडमनी सकारात्मक उत्तरें दिलीत. शाखेच्या कामाचेही त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
शाखेचे उपाध्यक्ष श्री सुनील सागवेकर यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले. बालरंगभूमीचे कार्यक्रम हे कार्यक्रम न राहता ही एक चळवळ व्हावी व त्यातूनच भविष्यात एक चांगला प्रेक्षक व माणूस घडण्यासाठी प्रयत्न व्हावा ही मनीषाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला पत्रकार शीतल करदेकर, साहित्य संघाचे सचिव श्री सुभाष भागवत ,मराठमोळं मुलुंड चे अध्यक्ष हेमंत मोरे, बालमोहन शाळेच्या पटवर्धन मॅडम, डॉ.किशुपाल मॅडम,निर्माते चेतन नाकते आणि बालरंगभूमी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीं करण्यांसाठीं श्री.देवू माळकर,नुपुर माळकर, गणेश तळेकर, लव क्षीरसागर, हनुमान पाडमुख, सौ.शरयू देसाई यांनी मोलाचा हातभार लावला.