अकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघातील अनेक महत्त्वपूर्ण कामे अर्धवट करूनही स्वतःला विकास पुरुष असे बिरुद लावणाऱ्या आमदार प्रकाश भारसाखळे यांनी आता आकोट शहरातील संत नरसिंग महाराजांच्या अपूर्ण मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त काढला असून त्यांनी स्वपक्षातील नेत्यांनाच नाही तर शेजारील मतदारसंघात आकोट तहसीलची गावे येत असूनही तेथील आमदार रणधीर सावरकर यांना या सोहळ्यातून वगळले आहे.
त्यामुळे या संदर्भात अनेकांनी भुवया उंचावून आमदार भारसाकळे हे महत्त्वपूर्ण नेत्यांना दूर ठेवून अर्धवट मंदिराचे लोकार्पण करणाऱ्या प्रधानमंत्री मोदी यांची नक्कल करीत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात संभ्रमित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनीही तीव्र नापसंती दर्शविली आहे.
आकोट शहरातील तहसील कार्यालयाची इमारत बरीच शिकस्त झाल्याने काँग्रेसच्या कार्यकाळात रामदास भाऊ बोडखे यांनी सर्व शासकीय कार्यालये एकत्रित असावीत या उद्देशाने प्रशासकीय इमारती करिता नवीन जागा मिळविली. त्याकरिता प्रशासकीय मान्यताही प्राप्त केली. या खटाटोपानंतर राज्यात सत्तापालट झाली.
परंतु या इमारतीची प्रक्रिया मात्र सुरूच होती. त्यामुळे नंतरच्या सरकारने या इमारतीकरिता निधी उपलब्ध करून दिला. त्यावर आज रोजी ही इमारत पूर्ण झाली असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा दि.१० फेब्रुवारी रोजी होत आहे. या लोकार्पणा सोबतच शहरातील संत श्री नरसिंग महाराज यांचे मंदिराचे विस्तारीत ईमारतीचेही लोकार्पण करण्यात येत आहे.
मात्र या दोन्ही लोकार्पणाबाबत जाणकार, सामान्य नागरिक आणि भाजप कार्यकर्ते यांचेमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. येथे उल्लेखनीय आहे कि, ही नवीन इमारत प्रशासकीय इमारत म्हणून मंजूर करण्यात आली होती. म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ट्रेझरी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक ही सारी कार्यालये एकाच छताखाली आणणे हा त्यामागील उद्देश होता.
मात्र आता या इमारतीचे केवळ तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणून लोकार्पण करण्यात येत आहे. दुय्यम निबंधक व भूमि अभिलेख ही कार्यालये मूळ ठिकाणीच राहणार आहेत. त्यामुळे या इमारतीचा उद्देश अर्धवटच राहणार आहे. या नवीन इमारतीपासून विद्यमान भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालय यातील अंतर तब्बल दोन किलोमीटर आहे.
त्यामुळे एकमेकांशी निगडित असलेली कामे करणेकरिता नागरिकांना अतिशय त्रासाचा सामना करावा लागणार आहे. ही दोन्ही कार्यालये याच इमारतीमध्ये ठेवली गेली असती तर अतिशय सोयीचे झाले असते. त्यामुळे जाणकारांच्या मते आमदार भारसाकळे यांनी हे अर्धवट काम केले आहे.
दुसरी चर्चा आहे ती नरसिंग महाराज यांचे मंदिर विस्तारित इमारतीची. आज रोजी पाहू जाता ही इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. या इमारतीची रंगरंगोटी झालेली नाही. या इमारतीची दारे व खिडक्या अद्याप बसविलेल्या नाहीत. या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग केलेली नाही.
याचा एक मजेदार किस्सा आहे तो असा कि, या इमारती ची आतील छपाई झाली आहे. त्यामुळे अंडरग्राउंड इलेक्ट्रिक फिटिंग करिता भिंतींना खाचा पडाव्या लागणार आहेत. परंतु त्या पाडू देण्यास बांधकाम कंत्राटदार राजी नाही. त्यामुळे गत दोन महिन्यांपासून इलेक्ट्रिक फिटिंग चा वांधा झाला आहे.
वास्तविक लोकार्पण करावयाचे होते तर आमदार भारसाखळे यांनी बांधकाम आणि विद्युत कंत्राटदारांमध्ये समन्वय घडवून आणावयास हवा होता. परंतु त्यांनी तसे करण्याऐवजी लोकार्पणाची घाई केली. त्यामुळे दिनांक १० फेब्रुवारी रोजी अशा अर्धवट मंदिर विस्तारीकरणाचे लोकार्पण करण्याची नामुष्की आमदार यांच्यावर ओढविली आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये नापसंती व्यक्त होत आहे.
आमदार भारसाखळे यांचे दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बाब आहे, त्यांच्या स्वपक्षाची आणि अन्य आमंत्रितांची. त्यातही आमदारांनी अर्धवट काम केले आहे. ते असे कि, त्यांनी आकोट उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. शेजारील अकोला पूर्व मतदार संघात आकोट तहसील मधील अनेक गावे येतात.
त्यामुळे राजशिष्टाचार म्हणून तेथील आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रे, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, शिक्षक आमदार किरण सरनाईक, स्थानिक स्वराज्य आमदार वसंत खंडेलवाल, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकणे गरजेचे होते.
याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आकोट मतदार संघात या आमदारांचे मोठ्या प्रमाणात व प्रभावी मतदार आहेत. परंतु स्वतःचाच टेंभा मिरवण्याची खोड आमदार भारसाखळे यांना असल्याने त्यांनी या ठिकाणी कुंठीत मती व अनौदार्याचे भव्य प्रदर्शन केले आहे.
दुसरीकडे आमदार भारसाखळे यांनी स्वपक्षातील किमान प्रदेश सचिव आमदार रणधिर सावरकर आणि भाजप जिल्हा अध्यक्ष यांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकावयास हवी होती. याचे कारण असे कि, या इमारतीकरिता नाही म्हटले तरी तत्कालीन भाजप शासनानेच निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
मात्र भारसाखळे यांनी जणू आपल्याच खिशातील निधी असल्यासारखे वर्तन करून स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण पत्रिकेतून खो दिला आहे. त्याने भाजपाचे अनेक कार्यकर्ते दुखावले आहेत. आमदार भारसाकळे यांच्या अशा वर्तनाने त्यांचे जिल्हा भाजपशी संबंध दुरावले आहेत कि काय? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.
एकूण या साऱ्या सोहळ्याचे स्वरूप बघता आमदार भारसाखळे हे विकास पुरुष आहेत कि मिस्टर अर्धवटराव आहेत? याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.