नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे.
MPSC च्या अभ्यासक्रमासंदर्भात काँग्रेसकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा.
मुंबई – (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.
दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले असल्याने सर्व उमेदवार संभ्रमात आहेत. एमपीएससीने संबंधित प्रसिद्धीपत्रक काढून हा संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आयोगाला द्याव्यात, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापती यांना पत्र पाठवून अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भातील संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. या पत्रात लोंढे पुढ म्हणतात की, MPSC ने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे.
आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ पासून न करता २०२५ पासून करण्यात यावी अशी काँग्रेस पक्षातर्फे आयोगास विनंती केलेली होती.
राज्यसेवा परीक्षेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी चार ते पाच वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहेत. या निर्णयामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळणार नाही. बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे तीन-चार वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.
महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम युपीएससीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित आयोगाने विचारात घेतले आहे असे दिसत नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ जुलै २०२२ रोजी वर्णनात्मक परीक्षेचा इंग्रजीमधील अभ्यासक्रम जाहीर केला त्यानंतर तीन महिन्यांनी १७ ऑक्टोबर २०२२ मराठी मध्ये अभ्यासक्रम जाहीर केला. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा ४ जून २०२३ रोजी आयोजित केली आहे. तांत्रिक सेवा ज्यामध्ये वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी कृषी सेवा या परीक्षांच्या मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रम जानेवारी अखेरीस जाहीर केला.
परीक्षा तोंडावर आल्या असताना आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. आयोगाने विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी लक्षात घेतल्या पाहिजेत.विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू करावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती.
यासंदर्भात दोन आंदोलने देखील करण्यात आली आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत आमची मागणी मान्य केली व त्याची घोषणा देखील केली. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने आयोगाला नेमके काय पत्र दिले आहे हे स्पष्ट नाही. म्हणून ‘राज्यसेवा परिक्षे संदर्भात २०२५ पासूनचा जो निर्णय जाहीर केला त्याचे प्रसिद्धीपत्रक आयोगाने त्वरित जाहीर करावे असे त्यांना सुचना देण्याची गरज आहे.