४०० घरकुलाचे उद्दिष्ट वाढविले…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया – ३ महिन्यापूर्वी राज्याच्या राजकीय पटलावर घडलेल्या घडामोडीनंतर खासदार प्रफुलभाई पटेल यांनी जनहिताच्या कामासाठी आपण सत्तेत सहभागी झाल्याचे सांगितले होते. यानुरूप जनहिताच्या कामांना प्राधान्य देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनहितार्थ सदैव तत्पर राहतात. याची अनुभूती येवू लागली आहे. राज्याचे मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्विकारताच खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वात कामांचा धडाका सुरू केला आहे.
गोंदिया जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टात ४०० घरकूलाची वाढ करून रमाई योजनेतंर्गत १८०० घरकूल बांधकामाना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच कामे त्वरित सुरू करण्याच्या सुचना केल्या आहेत. यामुळे प्रतिक्षा यादीत लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार व राष्ट्रीय नेते खासदार प्रफुलभाई पटेल हे राज्यात सत्तेत सहभागी झाले. दरम्यान जनहिताच्या कामासाठी सत्ता महत्वाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट सत्तेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुरूप गोंदिया जिल्ह्यात विकासकामांना गती देण्याचे काम सुरू झाल्याने सत्तेचा लाभ गोंदिया वासीयांना मिळत असल्याची अनुभूती येऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर गोंदियाचे पालकमंत्र्याची जबाबदारीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या खांद्यावर देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विकासकामांना गती देण्याचे कामही सुरू झाले आहे. पालकमंत्री आत्राम यांनी नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेवून थांबलेली कामे त्वरित पूर्ण करावे व निधी खर्च करण्याच्या सुचना केल्या.
त्याचप्रमाणे जनहित कामांच्या शृंखलेत जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टात ४०० ने वाढ करून रमाई योजनेच्या १८०० घरकूलांना मंजूरी प्रदान केली आहे. यामुळे अतिरिक्त यादीत किंबहूना विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यातील जनतेने खासदार प्रफुलभाई पटेल ,धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.
रमाई आवास योजनेतंर्गत १२५३ प्रकरणे
रमाई आवास योजनेतंर्गत आधीच्या उद्दिष्टाप्रमाणे यंत्रणेकडे एकूण १२५३ प्राप्त नस्ती आहेत. शिवाय ४०० लाभार्थ्यांची वाढ करून १८०० घरकूलांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. सन २०२२-२३ च्या पात्र-अपात्र गोषवारानुसार १२५३ पैकी ८२० प्रकरणे पात्र ठरली आहेत. तर ४३३ प्रकरणे त्रृटी व आक्षेपामुळे प्रलंबित आहेत.
तालुकानिहाय रमाई योजनेचे पात्र-अपात्र लाभार्थी
आमगाव तालुक्यातील १७ पैकी १४ पात्र तर ३ प्रलंबित, सालेकसा तालुक्यातील २२ पैकी १५ पात्र तर ७ प्रलंबित, तिरोडा २२६ पैकी १५३ पात्र तर ७३ प्रलंबित, गोरेगाव १२४ पैकी ७४ पात्र तर ५० प्रलंबित, गोंदिया २९८ पैकी १६३ पात्र तर १३५ प्रलंबित, सडक अर्जुनी २२९ पैकी १४३ पात्र तर ८६ प्रलंबित, अर्जुनी मोरगाव २९५ पैकी २१९ पात्र तर ७६ प्रलंबित, देवरी ४२ पैकी ३९ पात्र तर ३ प्रकरण प्रलंबित आहेत.