मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस खाली पडली. नदी कोरडी असल्याने मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलीस आणि प्रशासनाकडून अद्याप मृत्यूला दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा 20 पर्यंत वाढू शकतो. या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बस क्रमांक MP10-P-7755 ही मां शारदा ट्रॅव्हल्सची आहे, जी खरगोनहून इंदूरला जात होती. खरगोन-ठीकरी मार्गावर हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून जात असताना अचानक खाली पडली. मोठा आवाज झाला आणि गोंधळ झाला. बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते. दसंगा गावात हा अपघात झाला.
गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. सध्या गावकऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमींना मदत करण्यात गुंतले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी जोशी हेही घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले आमदार रवी जोशी यांच्याशी संवाद साधला असता, गावकऱ्यांनी सांगितले की, बसेस दररोज भरधाव वेगाने जातात. अनेकवेळा आम्ही बसचालकांना अडवले, पण ते दादागिरी करतात.