नांदेड – महेंद्र गायकवाड
नायगाव तालुक्यातील नांदगाव येथील पेपर वाहतूक करणाऱ्या आपल्या मुलाची गडगा – कहाळा रोडवरील फासावर लटकलेली घटना आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा आरोप मयताची आई रतनबाई प्रभू गागलवाड यांनी केला आहे .या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे करण्यात आली आहे.
वृत्तपत्रांच वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहन चालकाचा दिनांक 4 मार्च 2024 रोजी गडगा – कहाळा रोडच्या बाजूला फाशी घेतल्याची घटना पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली होती. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परंतु मयताची आई रतनबाई गागलवाड यांनी नायगाव पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी वारंवार मागणी केली परंतु त्या दृष्टीने पोलीस आणि कोणतीही कारवाई केली नसल्याने 2 एप्रिल 2024 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनामध्ये मयत नामदेव प्रभू गागलवाड याने ऑगस्ट 2023 मध्ये त्याचा सासरा दिगंबर महाजन गायकवाड व चुलत सासरा संदीप महाजन गायकवाड दोघे रा बळीरामपूर, नांदेड यांच्या सांगण्यावरून अडीच लाख रुपयांचे कर्ज काढून ओमनी गाडी विकत घेतली होती. असे निवेदनात म्हण्टले आहे.
चार चाकी वाहन वृत्तपत्राचे वाटपासाठी वापरण्यात येत होते. परंतु संदीप महाजन गायकवाड हा गाडी मधून वारंवार त्याच्या मैत्रिणीला घेऊन फिरत असे तसेच गाडीमधून नंदगाव येथील मयत नामदेव गागलवाड यांच्या रिकामे असलेल्या घरी त्या महिलेसोबत वारंवार मुक्काम करीत असे अशी माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली.
याच दरम्यान दिनांक 3 मार्च 2024 रोजी मयत नामदेव गागलवाड व संदीप महाजन गायकवाड यांनी त्या महिलेस घेऊन गावातील घरी मुक्काम केला होता. नांदेडकडे परत येताना दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून अथवा सदर महिलेसोबत दोघांचेही संबंध असल्याच्या संशयावरून संदीप गायकवाड याने नामदेवचा खून करून त्याचे प्रेत गडगा -कहाळा रोडवरील रस्त्याशेजारी फासावर लटकून टाकले असल्याचा आरोप मयताची आई रतनबाई प्रभू गागलवाड यांनी निवेदनात केला आहे.
याबाबत नामदेव गायकवाड तसेच दिगंबर गायकवाड व संदीप गायकवाड यांच्या मोबाईलचे लोकेशन व कॉल डिटेल्स तपासून संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. रतनबाई गागलवाड यांनी दिगंबर गायकवाड व संदीप गायकवाड हे दोघे वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखाची मागणी करीत असल्याने पोलीस संरक्षण देण्याची देखील मागणी आपल्या निवेदनात केली आहे.