न्यूज डेस्क : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील बहादूरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका महिलेला तिची अविवाहित मुलगी गर्भवती असल्याची माहिती मिळाली. यानंतर महिलेने आपल्या मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी कोणत्या तरी बहाण्याने मुलीला घरातून जंगलात नेले आणि तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी जवळपास 70 टक्के भाजली आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेची आई आणि भावाविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, बहादूरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवादा खुर्द येथे एका २३ वर्षीय अविवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मुलगी गरोदर राहिली. ही बाब मुलीच्या आईला कळताच तिने मुलासह मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी मुलीची आई आणि भाऊ तिला जवळच्या जंगलात घेऊन गेले आणि त्यांनी तिच्यावर पेट्रोल शिंपडले आणि तिला पेटवून दिले. या घटनेत मुलगी गंभीर भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (हापूर) राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आरोपी महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी ही घटना घडण्यापूर्वी आरोपी महिला आणि तिच्या मुलाने तिला मारहाण केली. यानंतर तिला जंगलात नेऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेदरम्यान मुलीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केल्यावर गावकऱ्यांना हा प्रकार कळला. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणून पोलिसांना माहिती दिली. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेला रुग्णालयात दाखल केले.